Thursday, January 27, 2011

एक सरकारी कार्यक्रम




गेल्या आठवड्यात एका सरकारी कार्यक्रमाला गेलो होतो. सूत्रसंचालक म्हणून. तसा चॅनलच्या डेस्कवर काम करत असल्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांशी हल्ली फारसा संबंध येत नाही. (अर्थात एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला राजीनामा देण्याची वेळ यावी वगैरे इतकं महान रिपोर्टिंग फिल्डवर असतानादेखील घडलं नाहीच). तर गेल्या आठवड्यात एक फोन आला. "अमोल जोशी बोलताय ना... मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या बदलापूर ऑफिसमधून बोलतोय. आमचा शनिवारी अमूक अमूक कार्यक्रम आहे... त्याचं सूत्रसंचालन करायचं आहे...तुमचं मित्र अमूक अमूक यांनी तुमचा रेफरन्स दिला...(असे रेफरन्स देणाऱ्यांना मी नेहमी पार्टी देतो.) तर तुम्हाला जमेल का?" योगायोगाने त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं मला काहीच अडचण नव्हती... मग कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पुन्हा फोन आला... कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे. मी विचारलं, "कशासाठी"? पलिकडून उत्तर - "साहेबांना महत्वाचं बोलायचं आहे." आता कार्यक्रमापूर्वी संयोजकांशी किंवा ज्याची मुलाखत घ्यायची असेल त्याला अगोदर भेटून पूर्वतयारी करावी असे सुप्रसिद्ध सूत्रसंचालकांनी लिहिलेले, सांगितलेले किस्से लक्षात होतेच. मी म्हटलं, "ठीक आहे. येतो उद्या." "स्टेशनवर आलात की फोन करा.. गाडी पाठवतो.."- प्राधिकरण. माझ्यासाठी गाडी पाठवणार म्हटल्यावर नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार, असं वाटलं.

गेलो दुसऱ्यादिवशी... आदल्या स्टेशनवरून फोन केला... "पाच मिनिटांत पोचतोय." "ठीक आहे. मी स्टेशनवरच आहे. वेस्टला बाहेर या. मी उभा आहे. तुम्ही कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय?" "निळ्या रंगाचा". स्टेशनच्या बाहेर गेलो... पांढरा शर्ट, काळी पँट आणि काळा गॉगल घातलेल्या व्यक्तीनं हात केला. ओळखपाळख झाली. मी अमूक अमूक... मी तमूक तमूक... "अच्छा तुम्ही टिव्हीवर असता का... बरं बरं.. कधी बघितल्यासारखं वाटत नाही... हल्ली बातम्या बघायला वेळच मिळत नाही.... अच्छा अच्छा.. हं हं हं... चला मग निघुया..?" आजूबाजूला गाडी तर दिसत नव्हती. त्यानं खिशातनं किल्ली काढली आणि शेजारी उभ्या असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडरला लावली.

ऑफिसमध्ये गेलो... साहेबांच्या केबीनमध्ये गेलो. आता मोजून पाच मिनीटांपूर्वीच मला टिव्हीवर कधीही न बघितल्याचं सांगणाऱ्या त्यानं, त्याची आणि माझी साताजन्माची ओळख असल्याप्रमाणं बॉसशी ओळख करून दिली. "हे अमोल जोशी... साम टिव्हीवर असतात... त्याआधी झी टिव्हीला होते... एकदम फेमस फेस आहे... आपले उद्याचे अँकर..." साहेबांनी चहा मागवला... आता 'महत्वाचं' काम. साहेबांनी कार्यक्रम पत्रिका पुढं ठेवली... बघून घ्या म्हणाले... मी पूर्ण वाचली. मग साहेबांनी एकएक करून महत्वाची कामं सांगितली. "नंबर एक - उद्याचा कार्यक्रम कडक व्हायला पाहिजे. नंबर दोन - कार्यक्रम बरोबर दहाला सुरू होणार... पत्रिकेत छापलेल्यांपैकी काहीजण आले नाहीत, तर त्यांची नावं घेऊ नका. कार्यक्रम पलिकडे आहे. म्हणजे ईस्टला.. मैदानावर.. तुम्ही यांच्यासोबत(हिरो होंडा) जाऊन ठिकाण बघून या. म्हणजे 'अंदाज' येईल. म्हटलं हे सगळं उद्या बोलता येणार नाही. म्हणून आजच सगळं क्लियर असलेलं बरं". मग हिरो होंडावाल्यानं साहेबांच्या देखत आणखी एका महत्वाच्या कामाची आठवण करून दिली. "प्रत्येक भाषणानंतर आणि सत्कारानंतर सारखं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं म्हणायचं." मी म्हटलं, "बरं. म्हणतो." मग हिरो होंडावरून मैदानात जाऊन कार्यक्रमाचा 'अंदाज' घेतला

दिवस दुसरा.. कार्यक्रमाचा... कार्यक्रम होता दोनच तासांचा. पण मूळ कार्यक्रम पत्रिकेतला आणि आदल्या दिवशी ठरवलेला क्रम आणि प्रत्यक्षात पार पडलेल्या कार्यक्रमाचा क्रम यात केवळ दीपप्रज्वलन आणि आभार हे दोनच कार्यक्रम ठरलेल्या नंबरावर पार पडले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच हिरो होंडा किंवा साहेब सोडून तिसऱ्याच एका अधिकाऱ्यानं माझा ताबा घेतला.... त्याच्या मते प्रमुख पाहुण्यांचा केवळ सत्कार करण्याऐवजी त्यांना अगोदर भाषण करायला लावायच, मग सत्कार करायचा आणि नंतर स्टेजवर बसायला सांगायचं... असं एकएक करून सगळे पाहुणे भाषण करून, सत्कार स्विकारून मग स्टेजवर येतील. मी म्हणालो की काल असं ठरलं नव्हतं आणि हे विचित्र वाटेल. त्यापेक्षा साहेबांना विचारा. थोड्या वेळानंतर साहेब माझ्याकडं आले आणि म्हणाले, "कुणी काही नवं सांगितलं, तर हो हो म्हणायचं. आणि आपलं ठरलंय तसंच करायचं. कुणाला दुखवायचं नाही." आता ठरलंय तसंच करायचं आणि दुखवायचंही नाही, अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी त्यांनी माझ्याकडे दिल्या. तोपर्यंत सव्वादहा वाजले होते.


मग हिरोहोंडावाले माझ्याकडे आले आणि म्हणाले की माईक ऑन करा आणि सूचना द्या की कार्यक्रम सूरू होतोय. सगळ्यांनी खुर्च्यांवर बसून घ्यावं. मी माईकवरून तशा सूचना दिल्या. मग म्हणाले सारखं साऱखं सूचना देत राहायचं. माझ्या सूचनांना कुणीच भीक घालत नव्हतं. तळ्याशेजारी गवत चरणारी म्हैस जशी तळ्यात दगड मारल्यावर फक्त एकदा मान वळवून तिकडं बघते आणि आपलं काम सुरू ठेवते, तितकाच प्रतिसाद मिळत होता. तेवढ्या अर्ध्या तासाच्या काळात आदल्या दिवशी प्लॅन न झालेल्या एक एक गोष्टी मला कळत गेल्या.... उदाहरणार्थ, पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर एका शाळेची टीम लेझीम सादर करणार आहे. निम्मे अधिकारी मैदानाच्या गेटवर उभे आहेत. त्यांच्यासोबतही एक लेझीम पथक आहे. हे पथक प्रमुख पाहुण्यांना वाजतगाजत स्टेजपर्यंत घेऊन येणार आहे. त्याची 'लाईव्ह कॉमेन्ट्री' करायची आहे. प्रमुख पाहुणे बदलले आहेत. इत्यादी. त्यानंतर हिरोहोंडावाले आणि नियोजनात सहभागी असणाऱा प्रत्येक अधिकारी स्टेजच्या बाजूला येऊन मला विचारत होता,"आपलं नाव आहे ना तुमच्याकडं? असेलच म्हणा... पण नंतर घोळ नको म्हणून लिहून घ्या... अ.ब.क." भाषणांची आणि सत्कारांची सोडून इतर नावं कुठंही येण्याची शक्यता नव्हती. पण दुखवायचं नव्हतं. लिहून घेतली नावं. अखेर पाहुणे आले.. लेझीम पथक राहिलं मागे आणि पाहुणे स्टेजवर पोचलेसुद्धा... मग स्वागत झालं. मग लेझीम झालं. सत्कार झाले. भाषणं झाली... सगळं झालं. कार्यक्रम संपला.


निघताना हिरो होंडाला भेटलो. म्हणाला, "पुढच्या वेळी जरा अजून तयारी करून या!"