Tuesday, December 2, 2014

स्वांड्या - एक किस्सा             आज मयऱ्यानं अबिदा परवीनची एक गझल पाठवली. व्हॉट्स ऍपवर. तेरे आनेका धोखा सा रहा है, दिया सा रातभर जलता रहा है. ऑफिसमधून परत येताना लोकलमध्ये व्हॉट्स ऍपवर आलेले मेसेजेस चाळत होतो. त्यावेळी पुन्हा एकदा त्या गझलकडं लक्ष गेलं. बॅगेतून हेडफोन लावून गझल ऐकू लागलो. माझं असं आहे की कुठलंही गाणं ऐकताना ते एखादी व्यक्ती, परिस्थिती, ठिकाण, वास, आठवण यापैकी कशा ना कशाशी रिलेट होतं. आजवर बऱ्याचदा ऐकलेली ही गझल आज रिलेट झाली ती स्वांड्याशी. स्वानंद कुलकर्णी.
      स्वांड्याला जाऊन आज किती दिवस झाले, हा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे की प्रत्येकवेळी त्याची आठवण आल्यावर तो गेलाय याची नव्यानं आठवण होत राहते. म्हणजे असं की प्रत्येकवेळी अगोदर स्वांड्या आठवतो आणि नंतर क्षणार्धात तो मेला आहे, हे आठवतं. मेलेला स्वांड्या आठवत नाही. नुसता स्वांड्या आठवतो आणि त्याला लागूनच, तो मेल्याची जाणीव.
सतत ऍक्टिव्ह असलेल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर डीपी म्हणून स्वांड्याचा फोटो आहे. गझल ऐकून झाल्यावर तो फोटो मोठा करून पाहिला. स्वांड्या गेलाय, हे वास्तव मी कधीच स्विकारलंय. तो गेला त्या क्षणीच. मात्र तो गेल्यानंतरच्या तीनेक आठवड्यात एक नवाच शोध लागलाय. वास्तव स्विकारणं ही एकदा करून संपणारी प्रक्रिया नाही. एकच वास्तव तुम्हाला अनेकदा स्विकारावं लागू शकतं. स्वांड्याच्या व्हॉट्सअप अकाऊंटचं स्टेटस आणि डीपी पाहण्याचा विचार मनात आला. तेही केलं. त्या नंबरवर काही मेसेज करावा का, असा विचारही डोक्यात आला. पण नाही केला. माझ्या जागी स्वांड्या असता, तर त्यानं मेसेज केला असता, असं वाटलं.
  स्वांड्यासोबत घालवलेल्या दिवसांपेक्षा रात्रीचाच हिशेब अधिक. तो दिवसा काय किंवा रात्री काय, तसाच असायचा. आम्हाला मात्र दिवसा त्याच्याइतकं खुलायला कधी जमलं नाही. त्यासाठी रात्रीचाच आधार लागायचा. पाचेक वर्षांपूर्वी जेव्हा स्वांड्याशी नवी नवी मैत्री झाली होती, त्यावेळी गप्पा मारायला आम्हाला अख्खी रात्र लागायची. त्यानंतर उत्तरोत्तर कमी वेळेत सगळं बोलून व्हायला लागलं. पहाटे आम्ही झोपत असू. गप्पांची सुरुवात कुणाच्या तरी (बहुतेक वेळा एकमेकांच्या) टिंगलटवाळीनं व्हायची आणि त्यानंतर गप्पांचे विषय करिअर म्हणजे काय, संगीत ऍप्रिशिएट कसं करायचं, संगीतकार हाच कसा खरा कलाकार वगैरेंवर जायचे. मग त्यानं कधीकाळी आणि अलिकडे लिहिलेले लेख वगैरेंचं तो वाचन करायचा. आमच्यासोबत जयराम किंवा डॉक्टर(कोल्हापूरचा मित्र) असला की ते म्हणायचे, बास करा तुमचं बुद्धी बुद्धी चोदवणं. मग लगेच उपरोक्त विषयांवरून स्वांड्याचा मोर्चा डॉक्टर ऑफिसला येताना कशी पावडर लावून येतो, मी कसा टर्मिनेटरसारखा चालतो वगैरे विषयांकडं वळायचा. स्वांड्याला कधीच कुणी बोअर झालं नाही आणि त्यानंदेखील कधीच बोअर झाल्याचं दाखवलं नाही. आता वाटतं की आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडून मनोरंजन करून घेता घेता त्याला खूपच बोअर केलं असणार. आणि आतादेखील स्वांड्याचं वाईट झालं, यापेक्षा स्वांड्या गेल्यामुळं माझं किती (मानसिक, भावनिक वगैरे) नुकसान झालं, याचा हिशेब करकरून आमच्या डोळ्यात पाणी येतंय. एकीकडं जगावं तर स्वांड्यासारखं, असं म्हणायचं आणि दुसरीकडं काहीही खाताना, पिताना, जागताना, फिरताना काही कमी-जास्त व्हायला नको, याच्या काळजीत जगायचं, हा दुटप्पीपणाही लक्षात आला स्वांड्याच्या मरणानंतरच. 
      त्याच्या भाच्याचा जन्म झाला, त्यावेळी त्यानं त्याच्याविषयी बरंच काय काय लिहून ठेवलं होतं. भाचा कळत्या वयाच्या झाल्यावर त्याला हे सगळं वाचून किती भारी वाटेल, या कल्पनेनं स्वांड्या एकदम तजेलदार व्हायचा. आपल्या जन्मावेळी असं कुणी लिहिलं नाही, मात्र तू तुझ्या मुलीबद्दल लिहून ठेव, असं वारंवार सांगायचा. त्याला लग्न करायची इच्छा होती. मात्र लग्न करण्यामागचा त्याचा अंतिम उद्देश हा चांगला बाप होणं, हा होता. अनेकदा त्यानं तो बोलून दाखवला होता. कशात काही नसताना, चांगला बाप होण्याच्या इच्छेनं लग्नाच्या तयारीला लागलेला माझ्या पाहण्यातला हा एकमेव माणूस. त्याच्या भाच्याशी त्याचं जमलेलं मेतकूट आणि वेणूसोबत त्याची जमणारी गट्टी यातसुद्धा त्याच्यातला बाप दिसायचा. राहून गेलं ते केवळ त्याचं बायोलॉजिकली बाप होणं.
स्वांड्या अकाली गेला हे खरं. मात्र त्याचं जे जगायचं राहिलं, ते पुढचं आयुष्य. मागचं सगळं आयुष्य तो भरपूर जगला. मागचं आयुष्य आपण जगलोच नाही, याची जाणीव ही अकाली निधनापेक्षा अधिक क्लेषदायक असते, हे डोक्यात येण्याचं कारणदेखील स्वांड्याच ठरला की! दशक्रियाविधीला पिंड ठेवल्या ठेवल्या कावळा शिवला.
रेल्वे स्टेशनच्या ब्रीजवर रात्रभर गप्पा मारत उभा असणारा स्वांड्या, साद्दा हक, एथ्थे रख, या गाण्यावर डोळे मिटून ठेका धरणारा स्वांड्या, दर पेगनिशी शांत होत जाणारा स्वांड्या, अरे वहिनीला भेटायला यायचंय, असं सुट्टीच्या आदल्या दिवशी सांगणारा आणि नंतर अरे जमलंच नाही म्हणणारा स्वांड्या, वैयक्तिक आयुष्यातलं काही शेअर करायचं असेल तर एकदा बसण्याची गरज आहे, असं सांगणारा स्वांड्या, जीएंनी ग्रेसना लिहिलेलं पत्र पहाटे तीन वाजता वाचून दाखवणारा स्वांड्या,  रॅशनल थिंकींग प्रत्यक्षात नाही जमत रे जोश्या असं म्हणत तोंड एवढंसं करून बसणारा स्वांड्या, असे अनेक वेगवेगळे स्वांडे आता आठवत राहतात. 

तो जिवंत असताना, हाकेच्या अंतरावर असताना, ऑफिसमध्येच असताना ज्या कारणांसाठी आठवत राहायचा, त्याच कारणांसाठी तो मेल्यावरही आठवत राहतो. एखाद्या किश्श्यासारखा. कुठलाही किस्सा हा प्रत्यक्षात घडत असताना त्याची महती लक्षात येत नाही. क्षणाक्षणाला घडत राहणाऱ्या घटनांसारखीच तीदेखील एक घटना असते. मात्र त्या घटनेचा, प्रसंगाचा जेव्हा भूतकाळ होतो, तेव्हा किस्सा म्हणून त्या घटनेची आठवण बनते. स्वांड्यासुद्धा एका किस्साच होता. तेव्हाही आणि आताही. 

Tuesday, October 15, 2013

जोडा आणि शालजोडीतले

दसरा मेळाव्यात मनोहर जोशींविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि मनोहर जोशींना व्यासपीठ सोडून निघावं लागलं. मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्याचा अशा प्रकारे अपमान होणे योग्य नाही, असे अनेकांना वाटत आहे. पक्षविरोधी मते मांडणाऱ्या लालकृष्ण अडवाणींना भाजपने दिलेल्या वागणुकीचे दाखले काहींनी शिवसेना नेतृत्वाला दिले आहेत. अडवाणींनीदेखील मोदींचं प्रमोशन सुरू असताना पक्षविरोधी भूमिका घेतली होती, मात्र पक्षाने त्यांना अपमानित न करता जशी सन्मानाची वागणूक दिली, तसे मनोहर जोशींच्या बाबतीत का झाले नाही, असा त्यांचा युक्तीवाद आहे.
अपमानाची व्याख्या प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार करावयाची ठरवली, तर मग कुणाचाही अपमान झाल्याचे सिद्ध करता येऊ शकेल. मनोहर जोशी आणि अडवाणी यांच्याबाबतीत घडलेले प्रसंग वेगवेगळे असले, तरी जोशींचा शिवसैनिकांनी अपमान केला आणि अडवाणींचा मात्र अपमान झाला नाही, या दाव्यात किती तथ्य आहे? अपमान होण्याच्या कारणांमध्ये त्या नेत्याची ज्येष्ठता (वयोपरत्वे, अनुभवाने आणि अधिकाराने) जर गृहित धरायची झाली, तर लालकृष्ण अडवाणींचे पारडे मनोहर जोशींपेक्षा अधिक जड आहे. त्यामुळं ज्येष्ठांचं म्हणणं डावलणं हा जर अपमानाचा निकष मानला, तर जोशींसोबत अडवाणींचाही अपमानच झाला होता, हे मान्य करावे लागेल.
मनोहर जोशी व्यासपीठावर आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी झाली त्यामुळे त्यांचा अपमान झाला, अडवाणींच्या बाबतीत हे घडले नाही, हा दुसरा दावा. उलट नरेंद्र मोदी अडवाणींच्या पाया पडले, हा या दाव्याच्या पुष्टर्थ मांडला जाणारा मुद्दा. ७ जूनला मोदींची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाली. १४ सप्टेंबरला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली. या दोन्ही प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीचा भाजपच्या निर्णयप्रक्रियेवर कुठलाच परिणाम झाला नाही. त्यानंतर तब्बल ११ दिवसांनी नरेंद्र मोदींना अडवाणींच्या पायावर डोकं ठेवण्याचा मुहूर्त सापडला होता. आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आणि पदं रितसर पदरात पडल्यानंतर आणि या पदांना आता कुणीही धक्का लावू शकत नाही याची खात्री झाल्यानंतर हा आदर दिसून आला. पक्षातल्या ज्येष्ठ व्यक्तीला गृहितच न धरणं, त्याच्या गैरहजेरीची दखल न घेता धोरणात्मक निर्णय घेणं आणि त्याला अनुल्लेखानं मारणं हा त्या नेत्याचा अपमान नव्हे काय? कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तीला त्याच्या तोंडावर शिव्या घालणं आणि त्या व्यक्तीकडे पूर्ण दुर्लक्ष करणं, यातली अधिक अपमानजनक कृती कुठली, हे ठरल्याखेरीज जोशींचा तो अपमान आणि अडवाणींचा तो सन्मान हे गृहितक कसे मांडावे?
जोशी आणि अडवाणी यांच्याबाबतीत हा वाद निर्माण होण्याचे तात्कालिक कारण हे पक्षाविषयी केलेले विधान आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाची धमक उद्धव ठाकरेंमध्ये नाही, हे मनोहर जोशींचं विधान. तर श्यामा प्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयींचा भाजप आता उरला नाही, हे अडवाणींचं वक्तव्य. या दोन्ही नेत्यांना अंतिमतः असेच म्हणावयाचे होते की जुन्या नेतृत्वाच्या तुलनेत पक्षाचे नवे नेतृत्व खुजे आहे. यापैकी जोशींचे विधान शिवसैनिकांना पक्षनेतृत्वाचा अपमान करणारे आहे, असे वाटले. त्यामुळे ते संतप्त झाले. भाजप कार्यकर्त्यांना मात्र अडवाणींच्या विधानात अपमानजनक असे काहीच वाटलेले दिसले नाही. अडवाणींच्या या विधानाचा एकाही भाजप नेत्याने जाहीर निषेधही केला नाही. त्यामुळे जर भाजपला अडवाणींचे विधानच अपमानजनक वाटले नसेल, तर त्यांचा कार्यकर्त्यांनी अपमान करण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळेदेखील अडवाणी आणि जोशींची तुलना याबाबतीत करणे अप्रस्तुत ठरते.
पक्षविरोधी विधानानंतर संतप्त होऊन नेत्याला घातलेल्या जाहीर शिव्यांपेक्षा नेत्याला मार्गदर्शकाच्या कोंदणात बसवून त्याला एकटे पाडणे आणि त्याच्या मताला किंमतच न देणे, हे अधिक अपमानजनक नव्हे काय? पाच मिनीटे तोंडावर ऐकाव्या लागणाऱ्या शिव्यांपेक्षा महिनोनमहिने होणारे दुर्लक्ष अधिक अपमानजनक नव्हे काय? पक्षातील ज्येष्ठ नेत्याने वेगवेगळ्या मार्गाने नाराजी व्यक्त करत राहावे, इतरांनी मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अडवाणी हे आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या दिशादर्शनाची आम्हाला गरज आहे, असे जाहीरपणे म्हणत राहावे आणि त्या नेत्याच्या सूचना प्रत्यक्षात हिशेबातही धरु नयेत, हा अधिक मोठा अपमान नव्हे काय?
मेळाव्यात अपमानित झाल्यानंतर जोशी मुंबई सोडून कुठल्याशा गावी निघून गेल्याचे कळते. अपमान झाल्याची त्यांच्या मनातली सल काही दिवसांच्या एकांतानंतर कमीदेखील होईल. मात्र घरातच सक्तीचा एकांतवास मिळालेल्याने काय करावे? अपमानाची उघडी पडलेली जखम एकवेळ बरी होईलदेखील. मात्र रोज होणाऱ्या अपमानाला जर सन्मान, सन्मान असे म्हणत लपवत राहिले, तर त्या जखमा बऱ्या कशा होणार? हे म्हणजे जोड्याने मारले की अपमान होतो आणि शालजोडीत लपवून मारले की सन्मान होतो, असे म्हटल्यासारखे आहे. 

Friday, October 4, 2013

बडी विरुद्ध लंबी जिंदगी

स्वतःचे विचार स्वतःलाच न पटणं आणि आपणांस पटणाऱ्या विचारांच्या विरुद्ध स्वतःच कृती करत राहणं या दोन्ही गोष्टी त्रासदायक. जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही हे वाक्य शाळेत असताना पहिल्यांदा कानावर पडलं. त्यावेळी ते वाक्य जितकं छान वाटलं तितकंच ते आजही आवडतं. जिंदगी बडी होनी चाहिए, हे पटतं. पण साधारण पस्तीशी ते चाळीशीत मरणाला हसत हसत स्विकारणाऱ्या आनंदसारखी परिस्थिती आपल्यावर आली, तर आपणदेखील हसत मरू का? याचं उत्तर नाही असंच येतं. याचं कारण कदाचित जिंदगी बडी असणं म्हणजे काय हे माहित नसणं असावं. तीस-एकतीस वर्षं गेली. कळत्या वयाचे झाल्यापासून जरी पकडलं तरी वीस-बावीस नक्कीच गेली. जिंदगी बडी असण्याचे नेमके निकष ठाऊक नसले, तरी आपल्या परिनं आपण ती बडी जगण्याचाच प्रयत्न केला. अर्थात, मुद्दाम कुणी कशाला जिंदगी छोटी जगेल? पण तरीही लंबी जिंदगीचं आकर्षण कमी व्हायला तयार नाही.
       दुसरा मुद्दा. लंबी जिंदगी जगण्याची इच्छा तर आहे. मात्र जिंदगीची लंबाई कमी करणा-या गोष्टींचं आकर्षणही सुटत नाही. जिंदगी लंबी होण्यासाठी आवश्यक आणि पोषक ठरणारे प्रयत्नही हातून होत नाहीत. बडी आणि लंबीमधला संघर्ष रात्रंदिवस सुरू आहे. मोहाच्या क्षणी बडी जिंदगी वश करते. मोहाचे क्षण नाकारणं म्हणजे बड्या जिंदगीला अव्हेरणं, असं वाटतं. मोहाचे क्षण सरुन भानावर यायला झालं की लंब्या जिंदगीचा भरवसा वाटेनासा होतो. जिंदगीची लंबाई आपणच आपल्या हातांनी कमी करत असल्याच्या जाणीवेनं काळजात धस्स होतं. बेधुंद क्षणी जिंदगीच्या लंबाईचं आकर्षण का राहत नाही? धुंदी उतरल्यावर जिंदगीच्या बड्या असण्याचं आकर्षण का उरत नाही?

       आयुष्य आत्ता नाही जगायचं, तर कधी जगायचं?’ हा काय प्रश्न आहे? काय याचा अर्थ? आजचा दिवस जगून आयुष्य संपवून टाकायचं असेल, तर या प्रश्नातील बेफिकिरी समजण्यासारखी आहे. मात्र या प्रश्नाला जोडूनच पुढचं वाक्य येत, उद्या काय होईल, कुणास ठाऊक?’ आजच्या जगण्याचं कारण हे जगण्याची ऊर्मी नाहीच. उद्याची अनिश्चितता आहे. त्यामुळं उद्याची जबाबदारी न घेता आज निघून जात असेलही, मात्र त्यामुळं कालनं करून ठेवलेली कर्जें फेडूनच आजची बेगमी करावी लागते. कर्जफेड आणि उधळपट्टी या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू राहिल्यामुळं हाती काहीच लागत नाही. कालचे कर्ज फेडून पुन्हा उद्याचे कर्ज तयार करणाऱ्या जगण्याला बडी जिंदगी तरी कसं म्हणावं? आणि अशी कर्जें फेडत १०० वर्षं जरी जगलो, तरी अशा लंबी जिंदगीचं कौतुक काय म्हणून करावं?

Thursday, October 3, 2013

कधी येणार 'नोटा' चॅनल?

अँकर – चर्चेच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजची चर्चा ही काही टेलिव्हिजनची चर्चा नाही. त्यामुळं कुणीही ती लाईटली घेऊ नये. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे नोटा (NONE OF THE ABOVE). आणि हा विषय घेण्यासाठी निमित्त ठरलाय एक सामान्य माणूस. निवडणुकांसाठी कोर्टानं जसा नोटा मान्य केला, तसाच अधिकार टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना का मिळू नये? सवाल तसा थेट, लॉजिकल आणि विचार करायला लावणारा आहे. या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत एक सामान्य माणूस, XY चॅनलचे संपादक आणि मंत्री. सो मिस्टर कॉमन मॅन, आपली नेमकी मागणी काय आहे?
माणूस – मतदारांचा मूलभूत अधिकार त्यांना मिळाला, तसाच मूलभूत अधिकार टीव्हीच्या प्रेक्षकांनादेखील मिळायला हवा.
संपादक – प्रेक्षकांचा कसला मूलभूत अधिकार?
माणूस – तुम्ही संपादक वाटतं?
संपादक – हो. का?
माणूस – असुद्या. असुद्या. निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार आवडला नाही तर आम्हाला आता नोटा नावाचे बटन दाबता येणार आहे. अशीच सोय चॅनल्सच्या बाबतीत असायला हवी.
मंत्री – बरोबर. कॉमन मॅनला काय वाटतं हे महत्वाचं.
अँकर – मतदानासाठी व्होटिंग मशीनवर बटनाची सोय होईल. पण चॅनलच्या बाबतीत हे कसं करणार? मागणी प्रॅक्टिकल वाटते तुम्हाला?
माणूस – ज्यानं ही मागणी केलीय त्यालाच ती प्रॅक्टिकल आहे का, असं विचारणं हे फक्त तुम्हीच करू शकता. हे काम फार कठीण नाही. नोटा नावाचं नवं न्यूज चॅनल सरकारनं सुरू करावं.
संपादक – आणि त्यावर काय दाखवणार?
माणूस – काहीच नाही.
अँकर – म्हणजे?
माणूस – त्यावर काहीच दाखवायचं नाही. ब्लॅक असेल ते. फार फार तर सात रंगाचे पट्टे लावून ठेवा उभे. प्रेक्षकांना कुठलंच चॅनल आवडलं नाही तर नोटा चॅनल लावून ठेवतील घरात.
संपादक – तुम्हाला चॅनल्स आवडत नसतील तर टीव्ही बंद करा ना. रिमोट तुमच्याच हातात आहे.
माणूस – नाही. उमेदवार आवडले नाहीत तर मतदानाला येऊच नका असे म्हटल्यासारखे झाले हे. मतदानाप्रमाणेच टीव्ही पाहणे हादेखील आमचा अधिकार आहे.
मंत्री – बरोबर आहे तुमचं. पण नोटा चॅनल लावून तुमचा हेतू कसा साध्य होणार?
माणूस – नोटा बटनातून जसा साध्य होणार तसाच.
मंत्री – नोटातून काहीच होणार नाही.
संपादक – होणार नाही असं कसं? ज्या ठिकाणी नोटाची मतं उमेदवारांना पडणाऱ्या एकूण मतांपेक्षा जास्त होतील, तिथं काय लाज राहिल हो उमेदवारांची?
माणूस – जर नोटा चॅनलला इतर चॅनल्सपेक्षा जास्त टीआरपी आला, तर इतर काय होईल हो इतर सर्व चॅनल्सचं?
संपादक – जे मतदार उमेदवार न आवडल्यामुळं मतदानाला येत नाहीत, त्यांना यायला प्रवृत्त करणं हा नोटाचा हेतू आहे. त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढेल.
माणूस – जे प्रेक्षक सर्व चॅनल्स बकवास म्हणून टीव्ही पाहत नाहीत, त्यांना आपली नापसंती व्यक्त करण्यासाठी नोटा चॅनल हे हक्काचं ठिकाण ठरेल. टेलिव्हिनज व्ह्युअरशिप वाढवणं, हादेखील नोटा चॅनलचा हेतू असेलच की.
मंत्री – कॉमन मॅनचा आवाज हाच आमचा आवाज.
संपादक – पण लोक हे चॅनल का लावतील? त्यातून त्यांना काय मिळणार आहे?
माणूस – नोटा बटन दाबून तरी त्यांना काय मिळणार आहे?
मंत्री – बरोबर आहे.
संपादक – चॅनल्स आणि पॉलिटिक्समध्ये फरक आहे हो. इथं फायद्या तोट्याची गणितं पाहावी लागतात.
मंत्री – आणि आम्ही काय फक्त टीव्ही बघत बसतो? नोटा चॅनलला आपला फुल्ल सपोर्ट आहे.
संपादक – चॅनल्स समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात. त्यामुळं पुरोगामी समाजमन...
अँकर – सर, सर.. ऑन एअर वाली चर्चा नाहीए.
संपादक – हां... पण तरीही आपलं...
मंत्री – असुद्या. असुद्या.
संपादक – मी सांगतो शून्य टीआरपी येईल या चॅनलला.
माणूस – ज्या दिवशी या चॅनलला शून्य टीआरपी येईल आणि ज्या दिवशी नोटा बटन एकही मतदार दाबणार नाही, तोच लोकशाहीचा सुदिन असेल.
अँकर – थोडक्यात, ह्या नोटाची मागणी जितकी तर्कसंगत आहे, तितकीच नोटा चॅनलचीदेखील. आता बघुया काहीच न दाखवल्या जाणाऱ्या या चॅनलची जबाबदारी पेलण्यासाठी अँकर आणि संपादक म्हणून कुणाची नियुक्ती होते. 

Friday, January 4, 2013

बलात्कार – एक मानवी भावनाएक आटपाट जंगल होतं. रोजच्या मानानं जंगलात आज भलतीच घाई सुरू होती. जंगलात आज प्राण्यांचा जाहीर टॉक शो होणार होता. निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. कार्यक्रमाच्या सूत्रधारापासून पाहुण्यांपर्यंत सगळ्यांची यादी जाहीर झाली होती. समस्त प्राणी परिवाराबरोबरच माणसाचा प्रतिनिधी म्हणून मिडियाला बोलावण्यात आलं होतं. जंगलातल्याच एका मोकळ्या जागेत स्टेज उभारण्यात आलं होतं. त्याच्या आजूबाजूचा परिसर अभ्यागतांच्या आसनव्यवस्थेसाठी साफसूफ करण्यात आला होता. प्राण्यांनी हळूहळू बसून घेतलं, गोंधळ कमी कमी होत गेला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

लांडगा - नरांनो आणि माद्यांनो, नमस्कार. या विशेष टॉक शो मध्ये आपलं स्वागत. मानवजातीकडून प्राण्यांच्या होणाऱ्या बदनामीचा निषेध करण्यासाठी आणि मानवाला त्याची चूक दाखवून देण्यासाठी या टॉक शोचं आयोजन करण्यात आलंय. प्राण्यांकडं पाहण्याचा मानवी दृष्टीकोन पहिल्यापासून कलुषित होताच. आता मात्र प्राण्यांची बदनामी करण्याची मोहिमच जणू मानवानं उघडल्याचं दिसतंय. हे असं का होतंय? यामागं कुणाचा हात आहे? यासारख्या प्रश्नांची उकल करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी मान्यवर पाहुणे म्हणून आपण आमंत्रित केलंय वाघ, कुत्रा, कबुतर आणि माणूस यांना. तर माणसा, मानवजातीकडून प्राण्यांची विनाकारण बदनामी केली जाते, हा आरोप तुला मान्य आहे का?
माणूस – मुळीच नाही. मुळात तुम्ही पाहुणे म्हणून मला बोलावलंत, आणि इथं मात्र मला ये-जा करत आहात. यालाच रानटी वृत्ती असं आम्ही म्हणतो. मानव जात ही त्याच्याकडं असलेल्या सभ्यतेमुळंच प्राण्यांपेक्षा वेगळी ठरते. सुरुवातीलाच तुम्ही नरांनो आणि माद्यांनो असं म्हणालात. आमच्याकडं बंधुंनो आणि भगिनींनो असं म्हणतात. त्यातूनही एक सभ्यता दिसते.

वाघ – प्राण्यांना अशी तोंडदेखली नाती जोडण्याची गरज वाटत नाही. तोंडावर बंधूंनो आणि भगिनींनो म्हणायचं आणि वेळ आली की बंधुंनी भगिनींवर बलात्कार करायचा. प्रत्येक जातीत नर आणि मादी हेच दोन प्रमुख घटक आम्ही मानतो आणि त्यांचा आदरही राखतो.

माणूस – पण ही नाती आम्ही तोंडदेखली जोडतो, असं म्हणायला काय आधार आहे?

वाघ – दिल्लीतल्या तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार विसरलास?
माणूस – त्याचं काय?
वाघ – तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांपैकी एकानं तिला अगोदर कम ऑन सिस्टर असं म्हणून बसमध्ये बोलावल्याचं मी कुठंसं ऐकलं. एवढंच काय, तुमच्या डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या शहरात भावानंच सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचंही ऐकलं. नाही जमत नाती पाळणं, तर कशाला उगाच माद्यांना बहिणी वगैरे म्हणत असता?

माणूस – ठिक आहे. ठिक आहे. आपण विषय सोडून दुसरीकडं भरकटतोय. प्रस्तावनेत लांडग्यानं मूळ मुद्दा असा मांडला होता, की माणसांकडून प्राण्यांची बदनामी होते आहे. हा अत्यंत बालिश आरोप असून पब्लिसिटी स्टंट आहे, असा माझा उलटा आरोप आहे.

कबुतर – मी सांगतो या आरोपाचं कारण. माणसाच्या घरांच्या खिडक्या आणि गॅलऱ्यांमध्ये बसून मी प्रत्यक्ष पाहिलंय. जेव्हा एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, तेव्हा त्या कृत्याचं वर्णन पाशवी बलात्कार, मानव झाला पशू असं केलं जातं. बलात्कारासारख्या अत्यंत हीन कृत्याला प्राण्यांशी जोडणं हा प्राण्यांचा अपमान तर आहेच, शिवाय माणूस ज्ञातीच्या अज्ञानाचीही परिसीमा आहे.

माणूस – त्यात अज्ञानाचा प्रश्न कुठं आला? एखादा आरोपी एखाद्या महिलेवर अत्याचार करतो, तेव्हा त्यांना पाशवीच म्हटलं पाहिजे. रानटीच म्हटलं पाहिजे.

कुत्रा – पण का? पाशवी का? रानटी का?

माणूस – कारण असे प्रकार मानव जातीला शोभणारे नाहीतच. असे प्रकार जंगली प्रवृत्तीचे लोकच करू शकतात. अन्यथा, एवढा शिकलेला, पुढारलेला, सुसंस्कृत असलेला मानव बलात्कार वगैरे हीन गोष्टी का करेल?

कुत्रा – बलात्कार फक्त मानवच करतो.

माणूस – काय? वेड बीड लागलं की काय तुला?
कुत्रा – होय. मी म्हणतो ते 100 टक्के खरं आहे. आम्ही प्राणी आणि पक्षी कधीच आमच्या माद्यांवर बलात्कार करत नाही. जगात कुठलाच प्राणी बलात्कार करत नाही. त्यामुळं मनुष्य हा प्राणी आहे, असं म्हणण्याचीदेखील आम्हाला लाज वाटते.

माणूस – हाहाहा. कुत्र्या, तू हे बोलतोयस. तू? ज्याला अनेकदा रस्त्यात आम्ही भलत्यासलत्या अवस्थेत पाहतो. एका मादीसाठी चार-चार नर कुत्रे एकमेकांशी भांडत असल्याचं तर मी शाळेत असल्यापासून पाहत आलोय. आणि म्हणे प्राणी बलात्कार करत नाहीत.

वाघ – अरे अरे अरे. कीव येते रे तुझी माणसा. तुझ्या अकलेचा अगदी मीडियाच झालाय की. मादीला मिळवण्यासाठी नरांमध्ये स्पर्धा असणं वेगळं आणि मादीवर बलात्कार करणं वेगळं. मादी मिळवण्यासाठी नरांमध्ये स्पर्धा असतेच. आणि सर्व प्रजातींमध्ये असते. मात्र इतर नरांना हरवून मादी मिळाल्यावर आम्ही तिच्यावर बलात्कार नाही करत. आम्ही मादीला संभोगासाठी कन्व्हिन्स करतो. आणि ती तयार नसेल, तर कुठलाही प्राणी बळजबरीनं मादीशी संभोग करत नाही. तुम्ही माणसं, तुमच्या सोयीसाठी इंटरनेटवरून, सोशल मीडियातून प्राण्यांविषयी अफवा पसरवता आणि आम्हाला तुमच्या श्रेणीत आणून बसवण्याचा प्रयत्न करता. कारण सत्य जाणून घेणं तुमच्या सोयीचं नसतं.

कुत्रा – मनुष्य हादेखील एक प्राणी आहे, हे सत्य सध्या मानवासाठी बचाव आणि प्राण्यांसाठी शरमेची बाब झालीय.
लांडगा – माझा एक प्रश्न आहे. मनुष्य हा प्राणी असूनदेखील बलात्कार का करतो? जर प्राणी बलात्कार करत नाहीत आणि मनुष्य हा प्राणी आहे, हा दोन्ही बाबी सत्य असतील, तर मनुष्य बलात्कार करतो, ही बाब तर्कसंगत ठरत नाही.

कुत्रा – तर्काला न पटणाऱ्या गोष्टी करणं, हेच तर मानव जातीचं वैशिष्ट्य आहे. जे प्राणी ओठांनी पाणी पितात, ते शाकाहारी असतात, आणि जे जीभेनं पाणी पितात, ते मांसाहारी असतात, असा सर्वसाधारण तर्क आहे. इतर सर्व प्राण्यांच्या बाबतीत तो लागू पडतो. मात्र माणसाच्या बाबतीत नाही. निसर्गानं संभोगाची भावना नैसर्गिकरित्या प्राण्यांमध्ये निर्माण केलीय. पण बलात्कार ही संकल्पनाच मनुष्यनिर्मित आहे.

वाघ – खरं आहे. प्रत्येक प्राण्याचा वंश वाढावा, यासाठी निसर्गानं प्रजननाची सोय केली. मानवानं मात्र भ्रूण हत्येचा शोध लावला. प्राणी कधीच भ्रूण हत्या किंवा गर्भपात करत नाही. मानवी संस्कृतीचा प्रवास हा खरंतर निसर्गभावनेकडून विकृतीकडं झालेला प्रवास आहे. माणूस जितका माणसाळत गेला, तितका तो नीच आणि असंस्कृत होत गेलाय.
माणूस – माणसाळण्याचा आणि असंस्कृत होण्याचा काय संबंध?
कबुतर – याचं मार्मिक उदाहरण म्हणजे आदिवासी. आदिवासी हा माणूस असूनदेखील बलात्कार करत नाही. कदाचित त्याला अजून तुमच्यासारख्या सुसंस्कृत माणसांची हवा लागली नसावी.

माणूस – मला मान्य आहे. पण केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नराधम समाजात आहे. सगळ्याच पुरुषांना तुम्ही एका पारड्यात जोखू शकत नाही. आणि केवळ पुरुषांनाच दोष काय म्हणून? तंग कपडे घालून फिरणाऱ्या महिलांमुळं पुरुषांच्या भावना उत्तेजित होतात आणि असे प्रसंग घडतात. महिलांदेखील याची काळजी घ्यायला नको का? समाजात वावरताना, कपडे घालताना भान राखायला नको का?

कुत्रा – हा देखील मानवाचा एक नीच पुरुषी बचाव. अरे नराधमांनो, कपड्यांचा आणि बलात्काराचा संबंध असता, तर प्राण्यांमध्ये सर्वाधिक बलात्कार झाले असते. हा प्रवृत्तीचा प्रश्न आहे. कपड्यांचा नाही.

माणूस – अं...

लांडगा – चर्चेच्या शेवटी हाच निष्कर्ष निघतो आहे, की बलात्काराशी प्राण्यांचा तीळमात्र संबंध नाही. अशा घटनांना प्राण्यांशी जोडून माणूस प्राण्यांचा घोर अपमान करतो आहे. बलात्कार, अत्याचार आणि स्त्री भ्रूणहत्या या शुद्ध मानवी भावना आहेत. 

(www.24taas.com वर प्रकाशित)

Sunday, December 30, 2012

शांतता! टीआरपी बंद आहेत...      बसनं वेग घेतला. सूर्य मावळतीला चालला होता. त्याची तिरपी किरणं खिडकीतून आत येऊन बसभर पसरली होती. बसमध्ये होते पत्रकारितेचे विद्यार्थी आणि त्यांचे दोन प्राध्यापक. ही एज्युकेशन ट्रीप चालली होती मुंबईला. मराठी न्यूज चॅनल पाहायला. बसच्या वाढत्या वेगासोबत आत घुसणारे थंड वारे विद्यार्थ्यांना अजूनच पॅशनेट करत होते, तर प्राध्यापकांना अंतर्मुख. थंड वाऱ्याच्या झुळुका चेहऱ्यावर घेत, डोळे मिटून, आपण एखादी मोठी बातमी ब्रेक करून त्यावर लाईव्ह देत उभे असल्याची स्वप्नं विद्यार्थी पाहात होते. रात्री एका हॉटेलवर गाडी थांबली तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकत्र बोलावलं आणि दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाबाबत सूचना द्यायला सुरुवात केली. उद्या सकाळी आपण मुंबईत पोचू. दुपारी बारा वाजता आपण चॅनलमध्ये जाणार आहोत. चॅनलमध्ये गेल्यावर काय करायचं, कसं वागायचं आणि महत्वाचं म्हणजे कसं वागायचं नाही, याच्या सूचना मी तुम्हाला निघण्याअगोदरच दिलेल्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट. उद्या बुधवार आहे. कुठल्याही चॅनलसाठी बुधवार हा सर्वात महत्वाचा दिवस असतो. त्यामुळंच खास बुधवारीच न्यूज चॅनल्समधलं वातावरण बघता यावं, हा आपल्या एज्युकेशन ट्रीपचा हेतू आहे. पण त्यासाठी तुम्हाला सांभाळूनच वावरावं लागेल. बुधवारी चॅनलमधल्या कुणाचा मूड कसा असेल, याचा अंदाज करता येत नाही. एखादा आनंदानं तुम्हाला मिठी मारेल, तर दुसरा शिव्या देऊन तुम्हाला हाकलूनही देऊ शकतो. हिंसकही होऊ शकतो. तेव्हा सावधान.
      कट टू बुधवारी दुपारी 12 वा. गेटवरच्या नावनोंदणी, पास वगैरे औपचारिकता पूर्ण करून भावी पत्रकार आतमध्ये आले. इतक्या लांबून आलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण ऑफिस फिरून, सगळे विभाग दाखवण्याची जबाबदारी एका सिनीयर आणि लोकप्रिय एँकरवर सोपवण्यात आली. प्राध्यापकांच्या मनात पहिली शंकेची पाल इथंच चुकचुकली. आपण पोचण्यापूर्वीच चॅनलमध्ये काहीतरी राडा झाल्याची शंका बळावली. इतक्या वर्षांत चॅनलमधील सर्वात नव्या आणि कमी महत्वाच्या व्यक्तीकडं येणारी ही जबाबदारी अचानक या सिनीअर अँकरकडं का यावी? पण अशी शंका जाहीरपणे विचारणं औचित्याला धरुन होणार नाही, असं वाटल्यामुळं प्राध्यापकांनी ही शंका मनातच गिळली. शिवाय सिनिअर असूनदेखील अँकरच्या बोलण्या वागण्यात असलेला साधेपणा प्राध्यापकांच्या नजरेतनं सुटला नव्हता. काहीतरी बिनसलंय हे तेव्हाच त्यांनी ताडलं.
अँकर विद्यार्थ्यांना घेऊन अगोदर स्टुडिओमध्येच गेला. हा स्टुडिओ. इथं सतत, 24 तास काही ना काही सुरू असतं. आमचा जो आवाज तुम्ही टिव्हीवर ऐकता, तो इथून बाहेर पडतो. इथं सतत किमान एक कॅमेरामन हजर असतो. जरी रिपीट बुलेटिन असलं, तरी तो इथून हलत नाही. सध्या तो इथंच कुठंतरी असेल. पण इथलं वातावरण सतत धावतं असतं. फारफार तर अर्धा तास वगैरे स्टुडिओ शांत असतो. मग पुढचं बुलेटिन लगेच सुरू होणार आहे का सर?” एक चौकस विद्यार्थी. नाही. आता पुढचं बुलेटिन थेट 2 वाजता. आत्ता एक कार्यक्रम सुरू आहे. एरव्ही अशा महत्वाच्या वेळी कुणी सलग दोन तासांचा कार्यक्रम वगैरे टाकत नाही. पण सध्या तो सुरू आहे. रिस्क आहे. पण नवे प्रयोग करण्याची अशी संधी चॅनलला परत मिळणार नाही ना!” का?” भावी शोध पत्रकारानं विचारलं. नंतर सांगतो. चला पुढं. असं म्हणून अँकरनं सगळ्यांना स्टुडिओतून बाहेर काढलं आणि शेजारीच असलेल्या पीसीआर (पॅनल कंट्रोल रुम) मध्ये घेऊन गेला. कंट्रोल रुम या नावावरनंच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथून सगळं कंट्रोल होतं. पण इथल्या लोकांवर कुणाचंच कंट्रोल नसतं. इथं होणाऱ्या आरड्याओरड्याचं टीआरपीशी समप्रमाण आहे. त्यामुळं आरडाओरडा हा भेसूर शब्द इथं मात्र गौरीप्रमाणं सोन्यामोत्याच्या पायांनी येतो. आठवडाभर इथं आरडाओरडा झाला नाही, तर मग बुधवारी तिथं होतो. तिथं म्हणजे कुठं विचारू नका. असं म्हणून त्यानं तिथल्या तोबरा भरलेल्या कर्मचाऱ्याला डोळा मारला. पण मग इथं सध्या एवढी शांतता का?” एका भावी तर्क-पत्रकारानं विचारलं. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे सध्या लाईव्ह बुलेटिन सुरू नाही. आणि दुसरं कारण शेवटी सांगतो. चला पुढं.
      या असे. समोरच्या दारातनं एक क्रिएटिव्ह राईट टर्न घ्या आणि समोर पाहा. हे ग्राफीक्स आणि ऍनिमेशन डिपार्टमेंट. अँकरनं माहिती दिली. तिथं सुरु असणारा गोंधळ, गप्पा, जोक्स पाहून विद्यार्थ्यांना हायसं वाटलं. निदान ग्राफिक्स विभागात तरी सर्वकाही आलबेल असल्याचं पाहून त्यांच्या मावळत चाललेल्या उत्साहाला पुन्हा उभारी मिळाली. तिथल्या एकदोन कर्मचाऱ्यांनी तर आपल्या खुर्च्या प्राध्यापकांना दिल्या आणि स्वतः बाहेर निघून गेले. गेल्या सहा वर्षांत असं सौजन्य प्राध्यापक पहिल्यांदाच पाहात होते. अजून किती दिवस रिलॅक्स रे?” अँकरनं ग्राफीक्समधल्या एकाला विचारलं. बहुदा पुढचा एक किंवा दोन आठवडे असतील. नक्की माहिती नाही. पण आठवडा असला, तरी चिक्कार झालं. विद्यार्थ्यांप्रमाणं प्राध्यापकांनीही मनातल्या मनात या संभाषणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पण कुणालाच काही कळालं नाही. हे असं जीवंत ग्राफीक्स डिपार्टमेंट मीदेखील एवढ्या वर्षांत आत्ताच बघतोय बरंका. एरव्ही इथल्या माणसांची उंची किती असावी, हेदेखील अंदाजानंच ओळखावं लागतं. केवळ येताना आणि जातानाच इथले कर्मचारी दोन पायांवर उठून उभे राहतात. एरव्ही इथं चिडीचूप शांतता असते. एकामागून एक ग्राफीक्स प्लेट्स, तुम्हाला दिसणाऱ्या विंडोज वगैरे करण्यातून यांना मान वर करून बघणंदेखील शक्य नसतं. पण सर, मग आज असं काय झालंय?” एका फॉलो अप पत्रकारानं विचारलं. अजून एक महत्वाचं ठिकाण दाखवायचंय. त्यानंतर सांगतो. अँकर.
      अँकर विद्यार्थ्यांना घेऊन न्यूजरुममध्ये गेला. न्यूजरुममधलं वातावरण पाहून पोरांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आजवर प्राध्यापकांनी जे सांगितलं, ऐकवलं, ते सगळं खोटं होतं, याची विद्यार्थ्यांना खात्रीच पटली. भर बुधवारसारख्या बुधवारी न्यूजरुममध्ये कुणीही घाईत नव्हतं, कुणी कुणाची आई किंवा बाप काढत नव्हतं. नजरेनं ओळखता येणारे सीनिअर्सही हसतखेळत काम करत होते. एका भींतीवर लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होत होत्या. ब्रेकिंग न्यूज असूनही त्यात व्याकरणाच्या चुका दिसत नव्हत्या. दुसऱ्या एका ब्रेकिंग न्यूजवर काम आणि चर्चा सुरू होती. तीदेखील अत्यंत शांतपणे. बायकोनं संपलेल्या किराणा सामानाची यादी सांगावी आणि नवऱ्यानं शांतपणे ती कागदावर उतरवून घ्यावी, त्याप्रमाणं एक तरुणी बातमी सांगत होती आणि दुसरा तरुण ती टाईप करत होता. सर, ही ब्रेकिंग न्यूज कशी देतात?” एका बोल-पत्रकारानं विचारलं. हा तर आपल्यापेक्षाही बेसिक प्रश्न विचारतो, असं अँकरच्या मनात आलं आणि तो सगळ्यांना थोडं पुढं घेऊन गेला. सध्या तुम्ही पाहताय, ती न्यूज चँनलमधली सगळ्यात गोंधळाची, गडबडीची आणि महत्वाची जागा. हे असाईनमेंट डेस्क आणि त्याशेजारी हे आऊटपूट. या सगळ्याला एकत्रितपणे न्यूजरुम असं म्हणतात. सर्वात अगोदर इनपूटकडं बातमी येते आणि लगेच ती आऊटपूटकडं जाते. मग इथं बसलेला व्यक्ती ती या पीसीवर टाईप करतो आणि त्याची ब्रेकिंग न्यूज होते. अशा एकामागून एक ब्रेकिंग न्यूज येत असतात. किंबहूना त्या याव्या लागतात. म्हणजेच त्या आणल्या जातात. त्यामुळं इथल्या लोकांवर प्रचंड दबाव असतो. दबाव सहन न झाल्यामुळं लोक आतून धुमसत असतात. त्यामुळं सर्वात जास्त शिव्याही इथंच जन्माला येतात. अँकर श्वास घेण्यासाठी थांबला. पण मग आत्ता असं वातावरण का नाहीए?” एक भावी शौर्य पत्रकार उद्गारली. अँकर म्हणाला, चला बाहेर. सांगतो गेटवर.
      अँकरच्या तोंडून गेटची भाषा निघताच आपली निरोपाची वेळ आल्याचं चतुर प्राध्यापकांनी ओळखलं. अँकरला शेकहँड करून ते म्हणाले, थँक्यु. यावेळी तुम्ही स्वतः वेळ काढून आम्हाला चॅनल दाखवलंत त्याबद्दल. संपादकांनाही धन्यवाद सांगा. अहो, तुम्हीच सांगा की त्यांना स्वतः भेटून अँकरनं प्रस्ताव ठेवला. हे ऐकून तर एसीतही प्राध्यापकांना घाम फुटला. काहीतरी भयंकर आणि विपरित घडल्याच्या शंकेवर जवळपास शिक्कामोर्तबच झालं होतं. गेल्या चारही वर्षी अगोदर निरोप देऊनही मिटींगमध्ये बिझी असणारे संपादक आज खरोखर भेटायला तयार असल्याची कल्पनाही प्राध्यापकांना असह्य होत होती. काही क्षणांत समोरून स्वतः संपादकच येताना दिसल्यावर प्राध्यापकांच्या चष्म्याआड धुकं साठायला सुरुवात झाली. संपादक आले. हसले. विद्यार्थ्यांशी काहीबाही बोलले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. अखेर विद्यार्थ्यांचे प्रश्न संपले तरीही संपादकांना निघण्याची कुठलीच घाई दिसत नव्हती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या रुपानं आयता प्रेक्षकवर्ग समोर उभा असताना त्यांनी इतर चॅनलचा उद्धारही केला नाही किंवा आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याची विनाकारण जाहीर खरडपट्टी काढून आपण संपादक असल्याची खातरजमाही करून घेतली नाही. प्राध्यापकांनी स्वतःला चिमटा काढून पाहिलं. कसंबसं सावरत घायाळ प्राध्यापक आणि अचंबित विद्यार्थी गेटवर पोचले. सगळ्यांच्या नजरेतला प्रश्न अँकरला नेमका कळला होता. त्यानं उत्तर दिलं, ऑक्टोबर महिन्यापासून न्यूज चॅनल्सचे टीआरपी येत नाहीएत. ते डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यापासून पुन्हा सुरु होतील. त्यामुळं इथल्या प्रत्येकाच्या आय़ुष्यातली सगळ्यात मोठी दिवाळी सध्या सुरू आहे. काही महिन्यांतच ती संपतेय. आणि मग सुरू होणार आहे इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शिमगा....

(दै. दिव्य मराठीच्या 29 डिसेंबर 2012 च्या अंकात प्रकाशित)