दसरा मेळाव्यात
मनोहर जोशींविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली आणि मनोहर जोशींना व्यासपीठ सोडून
निघावं लागलं. मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्याचा अशा प्रकारे अपमान होणे योग्य
नाही, असे अनेकांना वाटत आहे. पक्षविरोधी मते मांडणाऱ्या लालकृष्ण अडवाणींना
भाजपने दिलेल्या वागणुकीचे दाखले काहींनी शिवसेना नेतृत्वाला दिले आहेत.
अडवाणींनीदेखील मोदींचं प्रमोशन सुरू असताना पक्षविरोधी भूमिका घेतली होती, मात्र
पक्षाने त्यांना अपमानित न करता जशी सन्मानाची वागणूक दिली, तसे मनोहर जोशींच्या
बाबतीत का झाले नाही, असा त्यांचा युक्तीवाद आहे.
अपमानाची व्याख्या
प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार करावयाची ठरवली, तर मग कुणाचाही अपमान झाल्याचे
सिद्ध करता येऊ शकेल. मनोहर जोशी आणि अडवाणी यांच्याबाबतीत घडलेले प्रसंग वेगवेगळे
असले, तरी जोशींचा शिवसैनिकांनी अपमान केला आणि अडवाणींचा मात्र अपमान झाला नाही,
या दाव्यात किती तथ्य आहे? अपमान होण्याच्या कारणांमध्ये त्या नेत्याची ज्येष्ठता
(वयोपरत्वे, अनुभवाने आणि अधिकाराने) जर गृहित धरायची झाली, तर लालकृष्ण अडवाणींचे
पारडे मनोहर जोशींपेक्षा अधिक जड आहे. त्यामुळं ज्येष्ठांचं म्हणणं डावलणं हा जर
अपमानाचा निकष मानला, तर जोशींसोबत अडवाणींचाही अपमानच झाला होता, हे मान्य करावे
लागेल.
मनोहर जोशी
व्यासपीठावर आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी झाली त्यामुळे त्यांचा अपमान
झाला, अडवाणींच्या बाबतीत हे घडले नाही, हा दुसरा दावा. उलट नरेंद्र मोदी
अडवाणींच्या पाया पडले, हा या दाव्याच्या पुष्टर्थ मांडला जाणारा मुद्दा. ७ जूनला
मोदींची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाली. १४ सप्टेंबरला भाजपचे पंतप्रधानपदाचे
उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली. या दोन्ही प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ
नेते लालकृष्ण अडवाणी गैरहजर होते. त्यांच्या गैरहजेरीचा भाजपच्या
निर्णयप्रक्रियेवर कुठलाच परिणाम झाला नाही. त्यानंतर तब्बल ११ दिवसांनी नरेंद्र
मोदींना अडवाणींच्या पायावर डोकं ठेवण्याचा मुहूर्त सापडला होता. आपल्याला हव्या
असणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या आणि पदं रितसर पदरात पडल्यानंतर आणि या पदांना आता
कुणीही धक्का लावू शकत नाही याची खात्री झाल्यानंतर हा आदर दिसून आला. पक्षातल्या
ज्येष्ठ व्यक्तीला गृहितच न धरणं, त्याच्या गैरहजेरीची दखल न घेता धोरणात्मक
निर्णय घेणं आणि त्याला अनुल्लेखानं मारणं हा त्या नेत्याचा अपमान नव्हे काय? कुटुंबातल्या ज्येष्ठ
व्यक्तीला त्याच्या तोंडावर शिव्या घालणं आणि त्या व्यक्तीकडे पूर्ण दुर्लक्ष
करणं, यातली अधिक अपमानजनक कृती कुठली, हे ठरल्याखेरीज जोशींचा तो अपमान आणि
अडवाणींचा तो सन्मान हे गृहितक कसे मांडावे?
जोशी आणि अडवाणी
यांच्याबाबतीत हा वाद निर्माण होण्याचे तात्कालिक कारण हे पक्षाविषयी केलेले विधान
आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाची धमक उद्धव ठाकरेंमध्ये नाही, हे मनोहर जोशींचं
विधान. तर श्यामा प्रसाद मुखर्जी आणि अटल बिहारी वाजपेयींचा भाजप आता उरला नाही,
हे अडवाणींचं वक्तव्य. या दोन्ही नेत्यांना अंतिमतः असेच म्हणावयाचे होते की
जुन्या नेतृत्वाच्या तुलनेत पक्षाचे नवे नेतृत्व खुजे आहे. यापैकी जोशींचे विधान
शिवसैनिकांना पक्षनेतृत्वाचा अपमान करणारे आहे, असे वाटले. त्यामुळे ते संतप्त
झाले. भाजप कार्यकर्त्यांना मात्र अडवाणींच्या विधानात अपमानजनक असे काहीच वाटलेले
दिसले नाही. अडवाणींच्या या विधानाचा एकाही भाजप नेत्याने जाहीर निषेधही केला
नाही. त्यामुळे जर भाजपला अडवाणींचे विधानच अपमानजनक वाटले नसेल, तर त्यांचा
कार्यकर्त्यांनी अपमान करण्याचा प्रश्नच उरत नाही. त्यामुळेदेखील अडवाणी आणि
जोशींची तुलना याबाबतीत करणे अप्रस्तुत ठरते.
पक्षविरोधी
विधानानंतर संतप्त होऊन नेत्याला घातलेल्या जाहीर शिव्यांपेक्षा नेत्याला मार्गदर्शकाच्या
कोंदणात बसवून त्याला एकटे पाडणे आणि त्याच्या मताला किंमतच न देणे, हे अधिक
अपमानजनक नव्हे काय? पाच मिनीटे तोंडावर ऐकाव्या लागणाऱ्या शिव्यांपेक्षा महिनोनमहिने
होणारे दुर्लक्ष अधिक अपमानजनक नव्हे काय? पक्षातील ज्येष्ठ नेत्याने वेगवेगळ्या मार्गाने
नाराजी व्यक्त करत राहावे, इतरांनी मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अडवाणी
हे आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्या दिशादर्शनाची आम्हाला गरज आहे, असे जाहीरपणे
म्हणत राहावे आणि त्या नेत्याच्या सूचना प्रत्यक्षात हिशेबातही धरु नयेत, हा अधिक
मोठा अपमान नव्हे काय?
मेळाव्यात अपमानित
झाल्यानंतर जोशी मुंबई सोडून कुठल्याशा गावी निघून गेल्याचे कळते. अपमान झाल्याची
त्यांच्या मनातली सल काही दिवसांच्या एकांतानंतर कमीदेखील होईल. मात्र घरातच
सक्तीचा एकांतवास मिळालेल्याने काय करावे? अपमानाची उघडी पडलेली जखम एकवेळ बरी होईलदेखील.
मात्र रोज होणाऱ्या अपमानाला जर सन्मान, सन्मान असे म्हणत लपवत राहिले, तर त्या
जखमा बऱ्या कशा होणार? हे म्हणजे जोड्याने मारले की अपमान होतो आणि शालजोडीत
लपवून मारले की सन्मान होतो, असे म्हटल्यासारखे आहे.