Thursday, February 24, 2011

बसायचे आहे
डोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरचा हा फोटो आहे. सगळी बाकडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळं वैतागलेल्या काही तरूण मंडळींनी आयडियाची कल्पना लढवत इथल्या काही बाकड्यांवरचा आणि बोर्डांवरचा ‘ज्येष्ठ’ हा शब्दच खोडून टाकलाय.
या मैदानात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची गर्दी असते. मैदानात दिवसा क्रिकेट आणि रात्री फुटबॉल (प्रकाश कमी असल्यामुळे) खेळ सुरू असतो. बाजूला असणाऱ्या ट्रॅकवरून सकाळी आणि संध्याकाळी अनेकजण पोटासाठी(पोट कमी करण्यासाठी) चालत किंवा धावत असतात. थोडक्यात मैदानावर आणि मैदानाभोवतीच्या ट्रॅकवर अहोरात्र कॅलरीज जळत असतात. मात्र कॅलरीज जाळून झाल्यावर ज्यावेळी इथल्या बाकड्यांवर बसण्याची वेळ येते, तेव्हा मात्र इथल्या तरुणाईचा प्रॉब्लेम होतो. बघावं ते बाकडं ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळं आणि ज्येष्ठ नागरिक आल्यावर उठावंच लागत असल्यामुळं तरुण अनेकदा हिरमुसताना दिसतात. त्यामुळं सौजन्य वगैरे गोष्टींना वैतागलेल्या काहीजणांच्या डोक्यातून आलेली ही बालसुलभ, हतबल आयडिया मैदानात गेल्यागेल्या नजरेत भरते.
या मैदानात किंवा अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी घडणारा नेहमीचा प्रसंग. केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी असं लिहिलेल्या बाकड्यावर काही तरूण मंडळी बसून गप्पा मारतायत. तेवढ्यात एखादे आजी-आजोबा किंवा दोन आजोबा किंवा आज्या तिथं येतात. गप्पा मारणाऱ्या मुलांकडे बघतात. तरुणांना काहीच न बोलता, काही क्षण तिथेच ताटकळतात. मग तरुण आपसूक उठतात आणि त्यांना म्हणतात, “बसा आजोबा. तुमच्यासाठीच हे बाकडं ठेवलंय.” आजोबा बसतात. मग तिथून दुसरीकडे जाताना आजोबांना ऐकू येणार नाही, अशा आवाजात एकमेकांत संवाद “आयला, यांच्यासाठी बाकडी.... आमच्यासाठी कधी बाकडी ठेवणार नाहीत.”

ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची गरज आपल्यापेक्षा जास्त आहे, ज्येष्ठ नागरिकांची प्रत्येक ठिकाणी सोय होणं गरजेचंच आहे, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण मग आम्ही बसायचं की नाही, की ज्येष्ठ नागरिक होईपर्यंत आम्ही उभंच राहायचं, असा काहीसा हा प्रश्न आहे. शहरांमध्ये पैसे खर्च न करता, फक्त तास दोन तास निवांत बसण्यासाठी तरुणांकडचे पर्याय कमी होत चाललेत. पैसे खर्च करून एखादा मॉल, हॉटेल किंवा कॅफे गाठण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळेच कदाचित ‘बसणे’ हा शब्द मद्यपानाशी जोडला गेला असावा. कारण त्याशिवाय इतर कुठल्याही वेळी गप्पा मारण्यासाठी बसताच येत नाही.

लोकलमध्ये जागा मिळत नाही म्हणून, बसमध्ये चुकून लेडिज सीटवर बसला आणि लगेच एखाद्या महिलेनं उठवलं म्हणून, बागेमध्ये ज्येष्ठ नागरिक आले म्हणून, दुसऱ्या बागेत ‘कपल’ला प्रवेश नाही म्हणून, रेल्वे स्टेशन आणि बसस्टॉपवरची बाकडी कधीच मोकळी नसतात म्हणून तरुणांना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बसण्याची सोय उरलेली नाही. कधी नियमात बसत नाही म्हणून तर कधी सौजन्यात बसत नाही म्हणून, उभंच राहावं लागतं. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, हे जरी खरं असलं, तरी आताशा पाय खूप दुखायला लागलेत.