Thursday, February 24, 2011

बसायचे आहे
डोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरचा हा फोटो आहे. सगळी बाकडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळं वैतागलेल्या काही तरूण मंडळींनी आयडियाची कल्पना लढवत इथल्या काही बाकड्यांवरचा आणि बोर्डांवरचा ‘ज्येष्ठ’ हा शब्दच खोडून टाकलाय.
या मैदानात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची गर्दी असते. मैदानात दिवसा क्रिकेट आणि रात्री फुटबॉल (प्रकाश कमी असल्यामुळे) खेळ सुरू असतो. बाजूला असणाऱ्या ट्रॅकवरून सकाळी आणि संध्याकाळी अनेकजण पोटासाठी(पोट कमी करण्यासाठी) चालत किंवा धावत असतात. थोडक्यात मैदानावर आणि मैदानाभोवतीच्या ट्रॅकवर अहोरात्र कॅलरीज जळत असतात. मात्र कॅलरीज जाळून झाल्यावर ज्यावेळी इथल्या बाकड्यांवर बसण्याची वेळ येते, तेव्हा मात्र इथल्या तरुणाईचा प्रॉब्लेम होतो. बघावं ते बाकडं ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळं आणि ज्येष्ठ नागरिक आल्यावर उठावंच लागत असल्यामुळं तरुण अनेकदा हिरमुसताना दिसतात. त्यामुळं सौजन्य वगैरे गोष्टींना वैतागलेल्या काहीजणांच्या डोक्यातून आलेली ही बालसुलभ, हतबल आयडिया मैदानात गेल्यागेल्या नजरेत भरते.
या मैदानात किंवा अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी घडणारा नेहमीचा प्रसंग. केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी असं लिहिलेल्या बाकड्यावर काही तरूण मंडळी बसून गप्पा मारतायत. तेवढ्यात एखादे आजी-आजोबा किंवा दोन आजोबा किंवा आज्या तिथं येतात. गप्पा मारणाऱ्या मुलांकडे बघतात. तरुणांना काहीच न बोलता, काही क्षण तिथेच ताटकळतात. मग तरुण आपसूक उठतात आणि त्यांना म्हणतात, “बसा आजोबा. तुमच्यासाठीच हे बाकडं ठेवलंय.” आजोबा बसतात. मग तिथून दुसरीकडे जाताना आजोबांना ऐकू येणार नाही, अशा आवाजात एकमेकांत संवाद “आयला, यांच्यासाठी बाकडी.... आमच्यासाठी कधी बाकडी ठेवणार नाहीत.”

ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची गरज आपल्यापेक्षा जास्त आहे, ज्येष्ठ नागरिकांची प्रत्येक ठिकाणी सोय होणं गरजेचंच आहे, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण मग आम्ही बसायचं की नाही, की ज्येष्ठ नागरिक होईपर्यंत आम्ही उभंच राहायचं, असा काहीसा हा प्रश्न आहे. शहरांमध्ये पैसे खर्च न करता, फक्त तास दोन तास निवांत बसण्यासाठी तरुणांकडचे पर्याय कमी होत चाललेत. पैसे खर्च करून एखादा मॉल, हॉटेल किंवा कॅफे गाठण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळेच कदाचित ‘बसणे’ हा शब्द मद्यपानाशी जोडला गेला असावा. कारण त्याशिवाय इतर कुठल्याही वेळी गप्पा मारण्यासाठी बसताच येत नाही.

लोकलमध्ये जागा मिळत नाही म्हणून, बसमध्ये चुकून लेडिज सीटवर बसला आणि लगेच एखाद्या महिलेनं उठवलं म्हणून, बागेमध्ये ज्येष्ठ नागरिक आले म्हणून, दुसऱ्या बागेत ‘कपल’ला प्रवेश नाही म्हणून, रेल्वे स्टेशन आणि बसस्टॉपवरची बाकडी कधीच मोकळी नसतात म्हणून तरुणांना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बसण्याची सोय उरलेली नाही. कधी नियमात बसत नाही म्हणून तर कधी सौजन्यात बसत नाही म्हणून, उभंच राहावं लागतं. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, हे जरी खरं असलं, तरी आताशा पाय खूप दुखायला लागलेत.

6 comments:

 1. This has number of references for us..
  त्यामुळेच कदाचित ‘बसणे’ हा शब्द मद्यपानाशी जोडला गेला असावा. कारण त्याशिवाय इतर कुठल्याही वेळी गप्पा मारण्यासाठी बसताच येत नाही..

  ReplyDelete
 2. again d awesome narration by u!!!!
  well i literally laughed at some points yaa.

  मैदानाभोवतीच्या ट्रॅकवर अहोरात्र कॅलरीज जळत असतात.(wht a sense of humour)
  and बसमध्ये चुकून लेडिज सीटवर बसला. lolzzzz.

  well, i must say or rather suggest u to write a 'black comedy' in future (in comin days)
  u'll surely do it so well.

  nice one
  al d very best
  keep goin buddy :)

  ReplyDelete
 3. Kiran Dahale, AhmednagarFebruary 25, 2011 at 11:21 AM

  Amlya mastach lihitos re, Ethun pudhe tuza blog nakki vachat jayin. Ekade mazyakadehi, Nagari Nagari navacha - nagari bolitun sadar honara karyakram aahe. Nagarmadhlya aath diwsatil ghadamodinwar adharit nagari bolitale tirkas bhashya- ase ya kary.che swarup aahe. Tuzya blogcha malahi nakki upyog hoil.

  ReplyDelete
 4. अरे अमोल झकास लिहीलं आहेस. तुझा लेख वाचायला फार मजा येते राव.. क्या बात है... तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, हे जरी खरं असलं, तरी आताशा पाय खूप दुखायला लागलेत.. हे तर अव्वल आहे.
  तू लिहीलेले अगदी खरे आहे. खरचं बसायला जागा नाही डोंबिवलीत. अरे लग्न ठरल्यावर हा अनुभव आला. मी आणि वैशालीने लग्नाआधीचे भेटण्याचे सगळे दिवस चालत किंवा बाईकवरून घालवले. कारण निवांत बसायला जागा नाही.. त्यावेळी मला कॉर्पोरेटर व्हावंस वाटलं होतं. मी तरूणांसाठी विशेष उद्यान बनवणार होतो..
  असो.. कॉलेजमधे असतानाचा एक अनुभव शेअर करावासा वाटतोय. मी आणि माझा मित्र मकरंद जोशी रोटरी बागेत सुर्यनमस्कार घालायला जायचो.. एकदा बागेच्या एका कोपऱ्यात छान लॉन होतं तिथे नमस्कार मारत होतो. त्यावेळी दोन आजी आल्या आणि आम्हाला अक्षरशः हकलून लावलं. आम्ही कारण विचारलं. तेव्हा त्यावर त्यांनी सांगितलं की ही जागा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही बाकड्यांवर नमस्कार मारत नाहीयोत. आम्ही हिरवळीवर व्यायाम करतोय. पण ते ऐकून घ्यायला तयार नव्हते.. असो.. असे अनेक अनुभव येतात.

  तुझा ब्लॉग मात्र झकास...

  ReplyDelete
 5. क्या बात है अमोल...खरोखर 'बसणं'..गरजेचं आहे...मग ते चार मित्रांबरोबर गप्पा-टप्पा मारायला हवं किंवा एकट्यात आत्ममग्न व्हायला...पण खरोखर यामुळे हे दिसून आलंय की डोबिंवतील बसायला जागा नाही...खरं असेल हे...कारण म्हणूनच मी हल्ली ठाण्यात 'बसतो'..छान लिहिलंयस...

  ReplyDelete
 6. Hi Amol, Thoda usheer zala vachayla. Pan tuzi hee bakanchi kahani aflatun aahe. Tya bakana satat tyachyavar jyestha nagarik basaat asalyane kiti vait vatat asel nahi ? Tyachya ayushyatla romance Totally nighun gelay nahi ?
  Tya bakanche aatmakathan tuzya ekhadya dostane lihayala harakat nahi. Aamchya tarunait matra bakanchi ashi vanava navhati. Basayla jagahi khup hotya. Aso. Great ! Pradeep Bhide

  ReplyDelete