Sunday, July 22, 2012

दुपारची झोप


Shit. संध्याकाळचे सहा वाजत आले? संपला. हाही रविवार संपला. सहा वाजले म्हणजे संपलाच की. काहीच विशेष न करता, न लिहिता, न वाचता, ना पाहता हाही रविवार संपला. असं का होतं कळत नाही. रविवारी दुपारी लागलेल्या झोपेतून संध्याकाळी साडेपाच सहाला जाग येते, ती याच अपूर्णतेच्या, भीतीच्या, बरंच काही राहून गेल्याच्या रुखरुखीतून. असं काय करायचं होतं ते कळत नाही. मात्र दुपारच्या झोपेतून जाग येण्याचा तो क्षण पूर्वीसारखा मजेशीर राहिलेला नाही, हेच खरं. पूर्वीसारखा म्हणजे कॉलेजात असताना असायचा, तसा. हल्ली दुपारच्या झोपेतून जाग येतानाच एक अपराधीपणाची भावना सोबत असते. धक्का बसावा, तशी झोपेतून जाग येते. आतमध्ये काहीतरी ठसठसत असल्यासारखं होतं. न दुखणारं, न झोंबणारं मात्र तिथं नक्की, हमखास असलेलं. इंजेक्शनच्या प्रत्यक्ष दुखण्यापेक्षा ते टोचण्याआधीच मनातल्या काल्पनिक वेदनांनी डोळे मिटून घ्यावेत, तसं काहीतरी. अख्खा देह एक निराश विराणी होऊन जातो. सोमवारपासून सुरु होणाऱ्या नव्या आठवड्याचा वैताग म्हणून ही भावना येत असावी, कदाचित. किंवा गेल्या आठवड्यात तुम्हालाच दिसलेलं तुमचं नागवेपण सुट्टीच्या काळात थोडंफार झाकायचं होतं आणि ते झाकता आलं नाही, याचं वैषम्यही कदाचित. आजूबाजूला असलेली आणि सगळी अर्धवट वाचलेली पुस्तकं आपल्या अज्ञानाला वाकुल्या दाखवतायत, असा भास होतो. डिक्शनऱ्यांचे आणि संदर्भग्रंथांचे रॅक्स काळजात पोकळी तयार करतात. शनिवार-रविवारचे साधे पेपरही न वाचल्याची आठवण अपूर्णतेवर शिक्कामोर्तब करते. मग मी केलं काय, सुट्टी गेली कुठे? या प्रश्नांची उत्तरं मला माहित असतातही आणि नसतातही. आता काय करायचं, या प्रश्नाचं उत्तरही बराच काळ मिळत नाही.
            गावात राहणाऱ्या एखाद्या शाळकरी मुलाचे जर शहरात जवळचे नातेवाईक असले, तर त्याला दिवाळीच्या, मे महिन्याच्या सुट्टीत शहरात जाण्याची ओढ लागते. परीक्षेचा ताणदेखील शहरात जाण्याच्या कल्पनाविलासात तो त्याच्यापुरता सोपा आणि सुसह्य करून घेतो. जेव्हा सुट्टी संपून परत गावाकडं निघण्याची वेळ येते, तेव्हा मात्र उदास वाटायला लागतं. हाच मुलगा जेव्हा शिक्षण संपवून शहरात नोकरीला लागतो, तेव्हा हीच परिस्थिती उलट होते. घरची ओढ लागते आणि पुन्हा कामावर निघायची वेळ जवळ आली, की काहूर माजल्यागत होतं. असं काहूर माजण्यात आणि ओढ लागण्यातही एक मजा वाटते, कारण कुठल्या तरी एका बाजूला आकर्षण असतं. त्यामुळं आसक्ती-विरक्तीचा सीसॉ वरखाली होत राहतो. मात्र कुठल्याच बाजूला आकर्षण नसेल तर ? 1. बसलेला सीसॉ सुरू व्हायला हवा. 2. सीसॉ बदलायला हवा. 3. ?????