Sunday, December 30, 2012

शांतता! टीआरपी बंद आहेत...      बसनं वेग घेतला. सूर्य मावळतीला चालला होता. त्याची तिरपी किरणं खिडकीतून आत येऊन बसभर पसरली होती. बसमध्ये होते पत्रकारितेचे विद्यार्थी आणि त्यांचे दोन प्राध्यापक. ही एज्युकेशन ट्रीप चालली होती मुंबईला. मराठी न्यूज चॅनल पाहायला. बसच्या वाढत्या वेगासोबत आत घुसणारे थंड वारे विद्यार्थ्यांना अजूनच पॅशनेट करत होते, तर प्राध्यापकांना अंतर्मुख. थंड वाऱ्याच्या झुळुका चेहऱ्यावर घेत, डोळे मिटून, आपण एखादी मोठी बातमी ब्रेक करून त्यावर लाईव्ह देत उभे असल्याची स्वप्नं विद्यार्थी पाहात होते. रात्री एका हॉटेलवर गाडी थांबली तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकत्र बोलावलं आणि दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाबाबत सूचना द्यायला सुरुवात केली. उद्या सकाळी आपण मुंबईत पोचू. दुपारी बारा वाजता आपण चॅनलमध्ये जाणार आहोत. चॅनलमध्ये गेल्यावर काय करायचं, कसं वागायचं आणि महत्वाचं म्हणजे कसं वागायचं नाही, याच्या सूचना मी तुम्हाला निघण्याअगोदरच दिलेल्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट. उद्या बुधवार आहे. कुठल्याही चॅनलसाठी बुधवार हा सर्वात महत्वाचा दिवस असतो. त्यामुळंच खास बुधवारीच न्यूज चॅनल्समधलं वातावरण बघता यावं, हा आपल्या एज्युकेशन ट्रीपचा हेतू आहे. पण त्यासाठी तुम्हाला सांभाळूनच वावरावं लागेल. बुधवारी चॅनलमधल्या कुणाचा मूड कसा असेल, याचा अंदाज करता येत नाही. एखादा आनंदानं तुम्हाला मिठी मारेल, तर दुसरा शिव्या देऊन तुम्हाला हाकलूनही देऊ शकतो. हिंसकही होऊ शकतो. तेव्हा सावधान.
      कट टू बुधवारी दुपारी 12 वा. गेटवरच्या नावनोंदणी, पास वगैरे औपचारिकता पूर्ण करून भावी पत्रकार आतमध्ये आले. इतक्या लांबून आलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण ऑफिस फिरून, सगळे विभाग दाखवण्याची जबाबदारी एका सिनीयर आणि लोकप्रिय एँकरवर सोपवण्यात आली. प्राध्यापकांच्या मनात पहिली शंकेची पाल इथंच चुकचुकली. आपण पोचण्यापूर्वीच चॅनलमध्ये काहीतरी राडा झाल्याची शंका बळावली. इतक्या वर्षांत चॅनलमधील सर्वात नव्या आणि कमी महत्वाच्या व्यक्तीकडं येणारी ही जबाबदारी अचानक या सिनीअर अँकरकडं का यावी? पण अशी शंका जाहीरपणे विचारणं औचित्याला धरुन होणार नाही, असं वाटल्यामुळं प्राध्यापकांनी ही शंका मनातच गिळली. शिवाय सिनिअर असूनदेखील अँकरच्या बोलण्या वागण्यात असलेला साधेपणा प्राध्यापकांच्या नजरेतनं सुटला नव्हता. काहीतरी बिनसलंय हे तेव्हाच त्यांनी ताडलं.
अँकर विद्यार्थ्यांना घेऊन अगोदर स्टुडिओमध्येच गेला. हा स्टुडिओ. इथं सतत, 24 तास काही ना काही सुरू असतं. आमचा जो आवाज तुम्ही टिव्हीवर ऐकता, तो इथून बाहेर पडतो. इथं सतत किमान एक कॅमेरामन हजर असतो. जरी रिपीट बुलेटिन असलं, तरी तो इथून हलत नाही. सध्या तो इथंच कुठंतरी असेल. पण इथलं वातावरण सतत धावतं असतं. फारफार तर अर्धा तास वगैरे स्टुडिओ शांत असतो. मग पुढचं बुलेटिन लगेच सुरू होणार आहे का सर?” एक चौकस विद्यार्थी. नाही. आता पुढचं बुलेटिन थेट 2 वाजता. आत्ता एक कार्यक्रम सुरू आहे. एरव्ही अशा महत्वाच्या वेळी कुणी सलग दोन तासांचा कार्यक्रम वगैरे टाकत नाही. पण सध्या तो सुरू आहे. रिस्क आहे. पण नवे प्रयोग करण्याची अशी संधी चॅनलला परत मिळणार नाही ना!” का?” भावी शोध पत्रकारानं विचारलं. नंतर सांगतो. चला पुढं. असं म्हणून अँकरनं सगळ्यांना स्टुडिओतून बाहेर काढलं आणि शेजारीच असलेल्या पीसीआर (पॅनल कंट्रोल रुम) मध्ये घेऊन गेला. कंट्रोल रुम या नावावरनंच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथून सगळं कंट्रोल होतं. पण इथल्या लोकांवर कुणाचंच कंट्रोल नसतं. इथं होणाऱ्या आरड्याओरड्याचं टीआरपीशी समप्रमाण आहे. त्यामुळं आरडाओरडा हा भेसूर शब्द इथं मात्र गौरीप्रमाणं सोन्यामोत्याच्या पायांनी येतो. आठवडाभर इथं आरडाओरडा झाला नाही, तर मग बुधवारी तिथं होतो. तिथं म्हणजे कुठं विचारू नका. असं म्हणून त्यानं तिथल्या तोबरा भरलेल्या कर्मचाऱ्याला डोळा मारला. पण मग इथं सध्या एवढी शांतता का?” एका भावी तर्क-पत्रकारानं विचारलं. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे सध्या लाईव्ह बुलेटिन सुरू नाही. आणि दुसरं कारण शेवटी सांगतो. चला पुढं.
      या असे. समोरच्या दारातनं एक क्रिएटिव्ह राईट टर्न घ्या आणि समोर पाहा. हे ग्राफीक्स आणि ऍनिमेशन डिपार्टमेंट. अँकरनं माहिती दिली. तिथं सुरु असणारा गोंधळ, गप्पा, जोक्स पाहून विद्यार्थ्यांना हायसं वाटलं. निदान ग्राफिक्स विभागात तरी सर्वकाही आलबेल असल्याचं पाहून त्यांच्या मावळत चाललेल्या उत्साहाला पुन्हा उभारी मिळाली. तिथल्या एकदोन कर्मचाऱ्यांनी तर आपल्या खुर्च्या प्राध्यापकांना दिल्या आणि स्वतः बाहेर निघून गेले. गेल्या सहा वर्षांत असं सौजन्य प्राध्यापक पहिल्यांदाच पाहात होते. अजून किती दिवस रिलॅक्स रे?” अँकरनं ग्राफीक्समधल्या एकाला विचारलं. बहुदा पुढचा एक किंवा दोन आठवडे असतील. नक्की माहिती नाही. पण आठवडा असला, तरी चिक्कार झालं. विद्यार्थ्यांप्रमाणं प्राध्यापकांनीही मनातल्या मनात या संभाषणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पण कुणालाच काही कळालं नाही. हे असं जीवंत ग्राफीक्स डिपार्टमेंट मीदेखील एवढ्या वर्षांत आत्ताच बघतोय बरंका. एरव्ही इथल्या माणसांची उंची किती असावी, हेदेखील अंदाजानंच ओळखावं लागतं. केवळ येताना आणि जातानाच इथले कर्मचारी दोन पायांवर उठून उभे राहतात. एरव्ही इथं चिडीचूप शांतता असते. एकामागून एक ग्राफीक्स प्लेट्स, तुम्हाला दिसणाऱ्या विंडोज वगैरे करण्यातून यांना मान वर करून बघणंदेखील शक्य नसतं. पण सर, मग आज असं काय झालंय?” एका फॉलो अप पत्रकारानं विचारलं. अजून एक महत्वाचं ठिकाण दाखवायचंय. त्यानंतर सांगतो. अँकर.
      अँकर विद्यार्थ्यांना घेऊन न्यूजरुममध्ये गेला. न्यूजरुममधलं वातावरण पाहून पोरांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आजवर प्राध्यापकांनी जे सांगितलं, ऐकवलं, ते सगळं खोटं होतं, याची विद्यार्थ्यांना खात्रीच पटली. भर बुधवारसारख्या बुधवारी न्यूजरुममध्ये कुणीही घाईत नव्हतं, कुणी कुणाची आई किंवा बाप काढत नव्हतं. नजरेनं ओळखता येणारे सीनिअर्सही हसतखेळत काम करत होते. एका भींतीवर लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होत होत्या. ब्रेकिंग न्यूज असूनही त्यात व्याकरणाच्या चुका दिसत नव्हत्या. दुसऱ्या एका ब्रेकिंग न्यूजवर काम आणि चर्चा सुरू होती. तीदेखील अत्यंत शांतपणे. बायकोनं संपलेल्या किराणा सामानाची यादी सांगावी आणि नवऱ्यानं शांतपणे ती कागदावर उतरवून घ्यावी, त्याप्रमाणं एक तरुणी बातमी सांगत होती आणि दुसरा तरुण ती टाईप करत होता. सर, ही ब्रेकिंग न्यूज कशी देतात?” एका बोल-पत्रकारानं विचारलं. हा तर आपल्यापेक्षाही बेसिक प्रश्न विचारतो, असं अँकरच्या मनात आलं आणि तो सगळ्यांना थोडं पुढं घेऊन गेला. सध्या तुम्ही पाहताय, ती न्यूज चँनलमधली सगळ्यात गोंधळाची, गडबडीची आणि महत्वाची जागा. हे असाईनमेंट डेस्क आणि त्याशेजारी हे आऊटपूट. या सगळ्याला एकत्रितपणे न्यूजरुम असं म्हणतात. सर्वात अगोदर इनपूटकडं बातमी येते आणि लगेच ती आऊटपूटकडं जाते. मग इथं बसलेला व्यक्ती ती या पीसीवर टाईप करतो आणि त्याची ब्रेकिंग न्यूज होते. अशा एकामागून एक ब्रेकिंग न्यूज येत असतात. किंबहूना त्या याव्या लागतात. म्हणजेच त्या आणल्या जातात. त्यामुळं इथल्या लोकांवर प्रचंड दबाव असतो. दबाव सहन न झाल्यामुळं लोक आतून धुमसत असतात. त्यामुळं सर्वात जास्त शिव्याही इथंच जन्माला येतात. अँकर श्वास घेण्यासाठी थांबला. पण मग आत्ता असं वातावरण का नाहीए?” एक भावी शौर्य पत्रकार उद्गारली. अँकर म्हणाला, चला बाहेर. सांगतो गेटवर.
      अँकरच्या तोंडून गेटची भाषा निघताच आपली निरोपाची वेळ आल्याचं चतुर प्राध्यापकांनी ओळखलं. अँकरला शेकहँड करून ते म्हणाले, थँक्यु. यावेळी तुम्ही स्वतः वेळ काढून आम्हाला चॅनल दाखवलंत त्याबद्दल. संपादकांनाही धन्यवाद सांगा. अहो, तुम्हीच सांगा की त्यांना स्वतः भेटून अँकरनं प्रस्ताव ठेवला. हे ऐकून तर एसीतही प्राध्यापकांना घाम फुटला. काहीतरी भयंकर आणि विपरित घडल्याच्या शंकेवर जवळपास शिक्कामोर्तबच झालं होतं. गेल्या चारही वर्षी अगोदर निरोप देऊनही मिटींगमध्ये बिझी असणारे संपादक आज खरोखर भेटायला तयार असल्याची कल्पनाही प्राध्यापकांना असह्य होत होती. काही क्षणांत समोरून स्वतः संपादकच येताना दिसल्यावर प्राध्यापकांच्या चष्म्याआड धुकं साठायला सुरुवात झाली. संपादक आले. हसले. विद्यार्थ्यांशी काहीबाही बोलले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. अखेर विद्यार्थ्यांचे प्रश्न संपले तरीही संपादकांना निघण्याची कुठलीच घाई दिसत नव्हती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या रुपानं आयता प्रेक्षकवर्ग समोर उभा असताना त्यांनी इतर चॅनलचा उद्धारही केला नाही किंवा आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याची विनाकारण जाहीर खरडपट्टी काढून आपण संपादक असल्याची खातरजमाही करून घेतली नाही. प्राध्यापकांनी स्वतःला चिमटा काढून पाहिलं. कसंबसं सावरत घायाळ प्राध्यापक आणि अचंबित विद्यार्थी गेटवर पोचले. सगळ्यांच्या नजरेतला प्रश्न अँकरला नेमका कळला होता. त्यानं उत्तर दिलं, ऑक्टोबर महिन्यापासून न्यूज चॅनल्सचे टीआरपी येत नाहीएत. ते डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यापासून पुन्हा सुरु होतील. त्यामुळं इथल्या प्रत्येकाच्या आय़ुष्यातली सगळ्यात मोठी दिवाळी सध्या सुरू आहे. काही महिन्यांतच ती संपतेय. आणि मग सुरू होणार आहे इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शिमगा....

(दै. दिव्य मराठीच्या 29 डिसेंबर 2012 च्या अंकात प्रकाशित)

                                                         

Friday, November 23, 2012

ब्रेकचर्चा ऐन रंगात आली होती. दोन्ही पक्षाचे प्रवक्ते हिरीरीनं आपली बाजू मांडत होते. एकाचे आरोप, दुसऱ्याची उत्तरं, तिसऱ्याचे नवे आरोप, चौथ्याचं विश्लेषण.... सगळ्यांचे स्वर टीपेला पोचले होते. कुणीच कुणाला जुमानत नव्हतं. स्टुडिओतल्या चौघांपैकी एकालाही इतर तिघांचा मुद्दा पटत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरच्या आक्रमकपणाची जागा आता त्वेषानं घेतली होती. ब्रेकची वेळ उलटून चालली होती. ब्रेक.. ब्रेक.. ब्रेक... पॅनल प्रोड्युसर घशाच्या शिरा ताणून ओरडत होता. आपणदेखील ब्रेक घेण्यासाठी योग्य संधीच्याच शोधात होतो. अखेर एका प्रवक्त्याच्या तानेलाच सम मानून आपण ब्रेकसाठीचं वाक्य उचललं आणि प्राणायम करताना कोंडून ठेवलेला श्वास सोडल्यानंतर मिळतो, तसा सुटकेचा दिलासा मिळाला. आपल्या आयुष्यातल्या पहिल्या टॉक शोचा पहिला सेगमेंटच इतका वादळी झाल्यामुळं काय धीर आला होता आपल्याला! पण त्याचवेळी एक अवघडलेपणसुद्धा आलं होतं. इतक्या तावातावानं भांडणारे हे चौघे आता ब्रेकमध्ये काय करणार याचं. एकमेकांवर संतापलेल्या चौघांनी ब्रेकमध्ये अबोला धरला, तर तीन-चार मिनीटांचा वेळ काढायचा कसा? अशावेळी ब्रेकमध्ये काय करायचं असतं, हे कुणाला तरी विचारून घेतलं असतं, तर बरं झालं असतं. आता सगळे गप्प बसले, तर अवघडल्यासारखं होणार आणि पुन्हा भांडायला लागले, तर तारांबळ उडणार. ब्रेकचं वाक्य उच्चारता क्षणी या विचारांनी आपल्याला धडकी भरवली होती. प्रत्यक्षात जे घडलं, ते मात्र कल्पनेच्याही पलिकडचं होतं. आज बरी तयारी दिसतेय तुमची असं म्हणत विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यानं सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याला टाळी दिली आणि पलिकडं बसलेल्या राजकीय विश्लेषकाला डोळा मारला. तर सत्ताधारी प्रवक्त्यानं करतानाच इतक्या तयारीनं करतो, की बोलताना वेगळ्या तयारीची गरज लागत नाही, असं म्हणत हशा पिकवला होता.     विजयला दिवाळीच्या पहाटे घरी बसून फराळ करता करता हा प्रसंग आठवला. न्यूज चॅनलला अँकर म्हणून रुजू झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी विजय दिवाळीदिवशी घरी होता. गेले चारही दिवाळसण त्यानं बातम्या देत आणि मूळच्या मुंबईकर असणाऱ्या सहकाऱ्यांनी घरून आणलेले फराळाचे पदार्थ खात खातच घालवले होते. आता मात्र तो सिनीयर होता. दिवाळीचे तीनही दिवस सुट्टी मिळणं, हीच सिनीयर असल्याची पावती होती.     फराळ संपवून विजय घराच्या गच्चीवर आला. मुंबईच्या दमट हवेची सवय झाल्यामुळं गावातल्या हवेची झुळूक त्याला अधिकच थंड वाटली. सूर्य वर येऊ लागला होता. उगवत्या सूर्याकडं विजय पाहतच राहिला. गेल्या पाच वर्षांत हा क्षण त्यानं पाहिलाच नव्हता. चॅनलचा प्राईम टाईमचा अँकर असल्यामुळं तो सेकंड शिफ्टलाच यायचा. रात्री घरी पोचायचा दोन वाजता. झोपता झोपता तीन वाजायचे. मग कसला सूर्योदय पाहणार? झोपेतून जागा व्हायचा, तेव्हा पहिली दोन वर्षं रूम पार्टनर आणि त्यानंतर बायको, ऑफिसमध्ये पोचलेले असायचे. नेहमीप्रमाण त्या दिवशीदेखील तो 10, 10.30 ला जागा झाला होता. पावसाळ्याचे दिवस होते. झोपेतून जाग येताच, त्या दिवसाचं शेड्युल त्याच्या डोळ्यापुढं आलं. आज गुरुवार. रोजच्यासारखाच एक दिवस. पण उद्याचा दिवस थोडा वेगळा असेल. उद्या दहीहंडी. दिवसभर लाईव्ह कव्हरेज. वा. अँकरिंग करत दिवसभर स्टुडिओतूनच हंड्या पाहायच्या. त्याहीपेक्षा सेलेब्रिटी, त्यांचे डान्स वगैरे वगैरे. तेवढाच चेंज. पण यंदाची दहीहंडी साधी असणार. असणार म्हणजे काय असायलाच हवी. स्वाईन फ्लूनं थैमान घातलंय. दहिहंडीसाठी जमणाऱ्या गर्दीतून स्वाईन फ्लू किती पसरेल! कालच तर याविषयीच्या बातमीचा आपण व्हॉईस ओव्हर केला होता. असो. आज दिवसभर बहुदा याच विषयावर खेळावं लागणार. विचार करता करता त्याचा पुन्हा डोळा लागला आणि जाग आली तेव्हा दीड वाजत आला होता. झटक्यात अंथरुणातून उठून त्यानं आन्हिकं उरकली आणि ऑफिसमध्ये पोचला. दिवसभर चॅनेलच्या बातम्या दहिडंडीभोवतीच फिरत राहिल्या. रात्रीच्या टॉक शोलाही याच विषयावर चर्चा होती. मोठा दहिहंडी उत्सव भरवणारे, तीन वेगवेगळ्या पक्षांचे नेते चर्चेसाठी येणार होते. तिघांनाही चांगलंच फैलावर घ्यायचं ठरवून विजयनं शो सुरु केला. पहिला प्रश्न विचारला, स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं तो फैलावण्याची शक्यता नाही, तर खात्रीच आहे. याची कल्पना असतानाही दहीहंडी उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित करणं योग्य आहे का?” अगदी हाच प्रश्न अपेक्षित असल्याप्रमाणं तिघांनीही आपापली उत्तरं दिली. तिघांच्याही उत्तरातला समान मुद्दा होता, गोविंदाना मास्क पुरवणार असल्याचा. या उत्तरानं समाधान न झालेल्या विजयनं तिघांनाही टोचायला सुरुवात केली. त्यातल्या त्यात नवख्या आणि शामळू वाटणाऱ्या नेत्याला त्यानं जास्तच टार्गेट केलं. आपल्याकडे अँटि व्हायरस आहे म्हणून कॉम्प्युटरमध्ये मुद्दाम व्हायरस टाकण्यासारखा हा प्रकार नाही का?”, सर्पदंशाचं औषध आहे, म्हणून उगाच सापाचा दंश करून घेण्यात कसलं शहाणपण आहे?” वगैरे प्रश्न विचारून त्यानं तिन्ही आयोजकांची एकप्रकारे उलटतपासणीच सुरू केली. त्यातल्या नवख्या आयोजकाच्या कपाळावरील आठ्या वाढू लागल्या. त्यानं शेवटी चिडून विजयला विचारलं होतं, तुम्हाला जर इतकं भान आहे, तर आमचा दहिहंडी सोहळा दिवसभर लाईव्ह कव्हर करण्यासाठी तुमच्या चॅनलनं डिल केलंच कशासाठी?” यावर निरुत्तर झालेल्या विजयनं आपला गोंधळ यशस्वीपणे लपवत ब्रेक घेतला होता. पहिल्याच ब्रेकमध्ये, संपादकांनी फोनवरून प्रॉड्युसरला दिलेली सूचना, टॉकबॅकवरून विजयच्या कानात सांगण्यात आली होती. त्यानंतरची चर्चा दहिहंडीचं सांस्कृतिक महत्व आणि बदलत्या काळात दहिहंडी उत्सवात येत चाललेलं नावीन्य या विषयांवर रंगली. ब्रेकमध्ये त्यातल्या एका नेत्यानं विजयला विचारलं होतं, नवीन आहात वाटतं?” आणि तिघंही एकमेकांकडं बघून हसले होते. एखाद्या गुन्हेगाराविरुद्ध केस जिंकत आलेल्या वकिलाला, ऐन वेळी, त्या गुन्हेगाराच्या बाजूनं लढावं लागलं, तर जसं वाटेल, तसं विजयला वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी, सकाळपासून रात्रीपर्यंत, त्याच्या सहकारी अँकर्ससोबत तो दहिहंडी उत्सवाची लाईव्ह कॉमेंट्री करत होता. अमूक थराची हंडी, इतक्या थरांना तितकं बक्षीस, कोण सेलेब्रिटी कुठल्या गाण्यावर थिरकतोय किंवा थिरकतेय, स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आयोजकांनी नेमकी काय काळजी घेतलीय वगैरे मुद्द्यांवर दिवसभर त्याची बॅटिंग सुरू होती. ब्रेकमध्ये मात्र तो आयोजकांचा दांभिकपणा आणि आर्थिक बाजू सावरण्यासाठी चॅनलला कराव्या लागणाऱ्या तडजोडीविषयी पीसीआरमध्ये बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांशी बोलायचा. त्याच्या ऑन एअर बरं आणि ब्रेकमध्ये खरं बोलण्याच्या धोरणामुळं कुणाचंच व्यावसायिकनुकसान होणार नव्हतं.
     पुढंपुढं हेच धोरण विजयच्या अंगवळणी पडत गेलं होतं. बुलेटिन्स आणि टॉक शोमध्ये साचत राहिलेलं, तो ब्रेकमध्ये रितं करत होता. त्याच्या इतर सहकाऱ्यांचीही अशीच अवस्था होती. न्यूज ब्रॉडकास्टिंग हे धर्मयुद्ध असेल, तर ब्रेक हा कन्फेशन बॉक्स होता. ब्रेक या घटकाबद्दल विजयचा आदर दिवसेंदिवस वाढत होता. कर्मचारी असो वा संस्था, कोंडी सोडवून मोकळा श्वास घेण्याची गरज पूर्ण करणारी संधी म्हणजे ब्रेक अशी ब्रेकची व्याख्या विजयनं तयार केली होती. त्याचा ब्रेकशी असणारा लळा दिवसेंदिवस वाढत होता. रोजच्या टॉक शोमध्ये येणारे पक्षाचे प्रवक्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक त्याच्या खास ओळखीचे झाले होते. सुरुवातीच्या काळात असणारी औपचारिकता कमी होत होती. घोटाळे, धोरणं, शह-काटशह यावर रोज रात्री सडेतोड चर्चा घडत होत्या. अशा चर्चांना विजय इतका सरावला होता, की आज कुठला प्रवक्ता काय बोलेल, हे तो पैजेवर सांगायचा. केवळ विजयच नव्हे, तर रोजच्या चर्चांमध्ये भाग घेणाऱ्या प्रवक्त्यांनादेखील इतर प्रवक्त्यांचे मुद्दे माहित असायचे.
     एकदा असंच झालं. कुठल्याशा राजकीय विषयावर त्या रात्री चर्चा होती. सत्ताधारी प्रवक्ता स्टुडिओत होता, तर विरोधी प्रवक्ता, त्याच्या कार्यालयातून ओबीवरून सहभागी होणार होता. शो सुरु होण्यापूर्वी विजयनं त्याच्या प्रॉड्युसरला बाहेरून सहभागी होणाऱ्या प्रवक्त्याविषयी विचारलं. टॅफिकमुळं ओबी व्हॅन उशीरा पोचल्याचं विजयला समजलं. तो प्रवक्ता कनेक्ट व्हायला अजून काही मिनीटं लागणार असल्यामुळं, त्याच्याशिवायच शो सुरू करणं अपरिहार्य होतं. काऊंटडाऊन सुरू झालं, ओपनिंग मोंताज पडला, टॉक शोची स्टिंग ऑन एअर गेली आणि विजयनं शोला सुरुवात केली. विरोधी पक्षाचे प्रवक्ते काही वेळातच सहभागी होणार असल्याचं सांगून त्यानं सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यापासून चर्चेला सुरुवात केली. त्या प्रवक्त्यानंदेखील विरोधी प्रवक्ता उशिरा येणार असल्याचा फायदा घेत, विरोधक कुठल्या मुद्द्यांचं भांडवल करू शकतात आणि त्यासाठी कुठले बाळबोध संदर्भ देऊ शकतात, याची एक यादीच बोलून दाखवली. त्यानंतर डाव्या पक्षाचा प्रवक्ता बोलत असताना विरोधी प्रवक्ता कनेक्ट झाल्याचं विजयला सांगण्यात आलं. विजयनं जेव्हा त्यांना विरोधाचं कारण विचारलं, तेव्हा त्या प्रवक्त्यानं तेच मुद्दे, त्याच संदर्भांसहित मांडायला सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी आणि डावा प्रवक्ता छद्मीपणे हसू लागले. विजयला मात्र समजेना की सत्ताधारी प्रवक्त्याच्या अचूक अंदाजाला दाद देत हसावं, की विरोधकानं चेहऱ्यावर ओढलेल्या तळमळीला गंभीरपणे मान डोलवावी. त्यानंतर ब्रेकमध्ये विजयला समजलं की विरोधी प्रवक्त्यानं दुसऱ्या चॅनलवर केलेल्या अपमानाचा, सत्ताधारी प्रवक्त्यानं संधी साधत घेतलेला हा बदला होता. प्रश्न रोजचाच असल्यामुळं, एका विशिष्ट मर्यादेपलिकडं आक्रमक होणं, दोघांनाही कसं महागात पडू शकतं, याची जाणीवच त्या प्रवक्त्यानं करून दिली होती. ब्रेकनंतर पुढच्या सेगमेंटमध्ये मात्र त्यानं विरोधी प्रवक्त्याला अलगद सावरलं. या शोला येण्यापूर्वीच कशी आमची अनौपचारिक चर्चा झाली होती, तेव्हाच त्यांनी त्यांचे मुद्दे कसे खुल्या दिलानं मांडले होते, वगैरे भाष्य करत त्यानं विरोधी प्रवक्त्याचा केलेला पोपट थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला होता.
     ऑन एअर जाणाऱ्या जवळपास सगळ्याच गोष्टी विजयसाठी आता प्रेडिक्टेबल झाल्या होत्या. उत्सुकता वाटायची ती केवळ ब्रेकची. अनेक घोटाळ्यांचे खरे सूत्रधार, कुणाच्या खिशात किती कोटी गेले, कोण कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारतोय या सगळ्याचे इत्यंभूत तपशील त्याला ब्रेकमध्येच मिळायचे. ऑन एअर एकमेकांना कोंडित पकडणारे राजकीय नेते ब्रेकमध्ये मात्र को-ऑपरेटिव्ह असायचे. कुठल्याही पक्षानं नेमलेला नवा प्रवक्ता, सुरुवातीचे काही दिवस पक्षीय अभिनिवेषात राहायचा. ऑन एअर असणारं बेअरिंग तो ब्रेकमध्येही धरून ठेवायचा. नंतर एखाद्या दिवशी, ब्रेक सुरू असताना, आपल्या माईकवर हात ठेऊन विचारायचा, हे रेकॉर्ड तर होत नाहीए ना?” आणि बेरकीपणानं एखादं सोयीचं सत्य सांगून टाकायचा. दिवसभरातल्या औपचारिक धबडग्यात ब्रेक हीच सत्याचं दर्शन घडवणारी जागा होती.
     चॅनलवरची बातमीपत्रं आणि वादविवादांचे कार्यक्रम विजयचं करिअर घडवत होते, तर या कार्यक्रमांतले ब्रेक त्याला समृद्ध करत होते. ब्रेकमध्ये त्याला नागवं सत्य भेटत होतं आणि त्याचा नाद विजयला वेडावून सोडत होता. दिवसागणिक ब्रेकमध्ये येणारे अनुभव नवनवे असत. गेल्या जुलै महिन्यात त्याला आलेला अनुभव तर अधिकच धक्कादायक होता. महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. जुलै महिना सुरू झाला, तरी पावसानं हजेरी लावली नव्हती. त्या रात्री चॅनलवर दुष्काळाच्या विषयावर चर्चा होती. सत्ताधारी, विरोधक, राजकीय विश्लेषक, कृषीतज्ज्ञ असा लवाजमा एकत्र करून चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या भागातल्या गरमागरम चर्चेनंतर ब्रेक झाला. ब्रेकमध्ये नेहमीप्रमाणं सगळे नॉर्मलला येतील, असा अनुभवसिद्ध अंदाज विजयला होता. त्याच्या अंदाजाप्रमाणं इतर सर्वजण नॉर्मलला येऊन गप्पांमध्ये रंगलेदेखील. मात्र सत्ताधारी आमदार शांत होता. त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून, त्याच्या मनात काहीतरी निर्णायक शिजतंय, याचा अंदाज येत होता. विजय सहजच म्हणाला, अहो साहेब, ब्रेक सुरू आहे. इतकं शांत बसण्याची गरज नाही. त्यानंतर अचानक भानावर आल्यासारखा तो म्हणाला, विजय, आमच्या सरकारनं खरंच चुका करून ठेवल्यात. त्या जनतेसमोर यायलाच पाहिजेत. तुम्ही मला हे तीन-चार महत्वाचे प्रश्न विचारा. या सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं देणं सरकारसाठी सोयीचं नाही. मात्र या मुद्द्यावरून सरकार अडचणीत येऊ शकतं, हे तरी वरिष्ठांना आणि मंत्र्यांना कळेल. त्यानंतर विरोधी प्रवक्त्यालाही त्या आमदारानं असे चार-पाच मुद्दे दिले, जे सत्ताधाऱ्यांच्याच विरोधात जाणारे होते. ब्रेक संपला. त्या नेत्यानं दिलेले मुद्दे घेऊन विजय आणि विरोधक दोघंही तुटून पडले. तोदेखील या प्रश्नांची उत्तरं टाळून, लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न करत राहिला. शो हिट ठरला. संपादकांनीही अभ्यासपूर्ण प्रश्न विचारल्याबद्दल विजयची पाठ थोपटली. मात्र एखाद्या नेत्यानं स्वतःलाच अडचणीत आणणारे मुद्दे आपल्याला आणि विरोधकांना का पुरवावेत? हा प्रश्न मात्र विजयच्या मनात घोळत राहिला. त्याचं उत्तर पुढच्याच आठवड्यात त्याला मिळालं. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत त्या आमदाराचा तालुका घेतला नव्हता. या शोनंतर आठवडाभरात आलेल्या दुसऱ्या यादीत मात्र त्याच्या तालुक्याचं नाव समाविष्ट झाल्याचं विजयच्या ध्यानात आलं आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ब्रेकचा उपयोग आपल्यापेक्षा राजकारणीच अधिक सराईतपणे करून घेऊ शकतात, हे त्यानं मनोमन कबूल केलं होतं.
     मागच्या पाच वर्षांचा हिशेब काढला, तर विजयनं केलेल्या बुलेटिन्स आणि शोजची संख्या शेकडोंच्या घरात होती. मात्र आज यातलं काहीच त्याला आठवत नव्हतं. किंबहूना, लक्षात राहावं, असं ऑन एअऱ काहीच घडलंच नव्हतं. आठवत होते ते सगळे ब्रेकमधले किस्से, ब्रेकमधले खुलासे, ब्रेकमधल्या ब्रेकिंग आणि खऱ्या अर्थानं एक्सक्लुजीव न्यूज. सततचं लाऊड प्रेझेंटेशन आणि आरोपांच्या चिखलफेकीच्या वांझ बातम्यांमधून त्याला मानसिकदृष्ट्या टिकवून ठेवलं होतं ब्रेकनं. विजयच्या मनात नेहमी विचार चालायचे, सत्याच्या उत्कंठेपायी आपण पत्रकारितेत आलो. ही उत्कंठा पूर्ण होत गेली केवळ ब्रेकमध्येच. ब्रेकनंच आपल्याला शहाणं केलं. समंजस, व्यवहारी बनवलं. ऑन एअर जो केला, तो केवळ सराव होता, खरं कसब मिळवून दिलं, ब्रेकनीच. बातम्या आणि चर्चा या केवळ रचना होत्या. त्या रचनांचं रसग्रहण ब्रेकमध्येच झालं. ब्रेकमध्ये आपण किती खरे असतो! खरोखर आश्चर्यचकित होतो. खरेखुरे थक्क होतो आणि कुठलाही फिजिकल स्टान्स न घेताही अंतर्मुख होतो.
     घरातून आईनं मारलेली हाक कानावर पडल्यामुळं विजय भानावर आला. सूर्य चांगलाच वर आला होता. विजयनं गच्चीतून खाली पाहिलं. गावातले त्याचे काही मित्र त्याला भेटायला आले होते. विजय खाली आला आणि मित्रांसोबत गप्पांचा फड रंगायला सुरुवात झाली. एका मित्रानं विचारलं, विजय, तुझा कार्यक्रम आम्ही सहसा चुकवत नाही. कार्यक्रमात तू काय करतोस, बोलतोस ते आम्ही पाहतोच. पण ब्रेकमध्ये तू काय करत असतोस?” विजयच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. तो म्हणाला, ऑन एअर असताना शो करतो आणि ब्रेकमध्ये पत्रकारिता.
अमोल जोशी.checkamol@gmail.com(न्यूजरुम लाईव्ह या दिवाळी अंकासाठी ही कथा लिहिली होती.)

Sunday, July 22, 2012

दुपारची झोप


Shit. संध्याकाळचे सहा वाजत आले? संपला. हाही रविवार संपला. सहा वाजले म्हणजे संपलाच की. काहीच विशेष न करता, न लिहिता, न वाचता, ना पाहता हाही रविवार संपला. असं का होतं कळत नाही. रविवारी दुपारी लागलेल्या झोपेतून संध्याकाळी साडेपाच सहाला जाग येते, ती याच अपूर्णतेच्या, भीतीच्या, बरंच काही राहून गेल्याच्या रुखरुखीतून. असं काय करायचं होतं ते कळत नाही. मात्र दुपारच्या झोपेतून जाग येण्याचा तो क्षण पूर्वीसारखा मजेशीर राहिलेला नाही, हेच खरं. पूर्वीसारखा म्हणजे कॉलेजात असताना असायचा, तसा. हल्ली दुपारच्या झोपेतून जाग येतानाच एक अपराधीपणाची भावना सोबत असते. धक्का बसावा, तशी झोपेतून जाग येते. आतमध्ये काहीतरी ठसठसत असल्यासारखं होतं. न दुखणारं, न झोंबणारं मात्र तिथं नक्की, हमखास असलेलं. इंजेक्शनच्या प्रत्यक्ष दुखण्यापेक्षा ते टोचण्याआधीच मनातल्या काल्पनिक वेदनांनी डोळे मिटून घ्यावेत, तसं काहीतरी. अख्खा देह एक निराश विराणी होऊन जातो. सोमवारपासून सुरु होणाऱ्या नव्या आठवड्याचा वैताग म्हणून ही भावना येत असावी, कदाचित. किंवा गेल्या आठवड्यात तुम्हालाच दिसलेलं तुमचं नागवेपण सुट्टीच्या काळात थोडंफार झाकायचं होतं आणि ते झाकता आलं नाही, याचं वैषम्यही कदाचित. आजूबाजूला असलेली आणि सगळी अर्धवट वाचलेली पुस्तकं आपल्या अज्ञानाला वाकुल्या दाखवतायत, असा भास होतो. डिक्शनऱ्यांचे आणि संदर्भग्रंथांचे रॅक्स काळजात पोकळी तयार करतात. शनिवार-रविवारचे साधे पेपरही न वाचल्याची आठवण अपूर्णतेवर शिक्कामोर्तब करते. मग मी केलं काय, सुट्टी गेली कुठे? या प्रश्नांची उत्तरं मला माहित असतातही आणि नसतातही. आता काय करायचं, या प्रश्नाचं उत्तरही बराच काळ मिळत नाही.
            गावात राहणाऱ्या एखाद्या शाळकरी मुलाचे जर शहरात जवळचे नातेवाईक असले, तर त्याला दिवाळीच्या, मे महिन्याच्या सुट्टीत शहरात जाण्याची ओढ लागते. परीक्षेचा ताणदेखील शहरात जाण्याच्या कल्पनाविलासात तो त्याच्यापुरता सोपा आणि सुसह्य करून घेतो. जेव्हा सुट्टी संपून परत गावाकडं निघण्याची वेळ येते, तेव्हा मात्र उदास वाटायला लागतं. हाच मुलगा जेव्हा शिक्षण संपवून शहरात नोकरीला लागतो, तेव्हा हीच परिस्थिती उलट होते. घरची ओढ लागते आणि पुन्हा कामावर निघायची वेळ जवळ आली, की काहूर माजल्यागत होतं. असं काहूर माजण्यात आणि ओढ लागण्यातही एक मजा वाटते, कारण कुठल्या तरी एका बाजूला आकर्षण असतं. त्यामुळं आसक्ती-विरक्तीचा सीसॉ वरखाली होत राहतो. मात्र कुठल्याच बाजूला आकर्षण नसेल तर ? 1. बसलेला सीसॉ सुरू व्हायला हवा. 2. सीसॉ बदलायला हवा. 3. ?????

Saturday, March 3, 2012

आज मै शुद्धीत हूँ |


बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ,
होश है पुरा मुझे, चड्डीत हूँ |

रातमें कल की हुआ था झोल थोडा,
आया किडा, केला नरड्याचा बोळ ओला,
चोळला झंडू, पिळला लिंबू, सद्दीत हूँ
बहुत दिनोंमे आज मै शुद्धीत हूँ.......

ना माशूक मेरी डॉट डॉट आहे, बॉस भी नहीं बीप बीप
माजही convert  झाला, औकात भी हुई है zip
घ्या मला, मारा माझी, आपकी मुठ्ठीमें हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ |
  
मानता हूँ गुलजार सबका बाप है  
गालीबशी तुलना करू, क्या मेरी औकात है |
'धार' गेली, 'तार' गेली, खालच्या पट्टीत हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ  |

वचन माझे क्रांतीचे और बोलबच्चन रातके
एक मेमो, और हातमें आ जाती है फाटके
घबरा घबराकेही सबकी गट्टीत हूँ
बहुत दिनोंमें आज मै शुद्धीत हूँ |

                                          अमोल जोशी.