Tuesday, May 10, 2011

गावात काय आहे?




मी गावात राहतो. जन्मापासून. गावातल्या शाळेत शिकलो. कॉलेजला तालुक्याच्या गावी गेलो. ग्रॅज्युएट झालो. सेकंड क्लास मिळाला. घरची परिस्थिती बेताची.. ग्रॅज्युएट झालो तेव्हा वडील शेती करायचे. थकले होते. मी शेतीत कधी लक्ष घालतो याची वाट बघत होते. लवकरात लवकर कमवायला सुरूवात करायची होती. शेतीतही लक्ष घालायचं होतं. बरोबरचे काही मित्र पुढच्या शिक्षणासाठी गाव सोडून पुण्या-मुंबईला गेले. मी विचार केला, आपण गाव सोडणं बरोबर होणार नाही. शेती कोण करणार? आईवडिलांकडं कोण बघणार? शेती करायला सुरूवात केली. नोकरीचा शोध सुरू होताच. बरेच दिवस नोकरी मिळत नव्हती. सरकारी नोकरी मिळवण्याएवढी ऐपतही नव्हती आणि ओळखही. दोन वर्षांनी शुगर फॅक्टरीत लागलो. पगार विचारू नका.

गाव सोडलेले मित्र फोन करायचे. काहीजणांचं शिक्षण संपून चांगली नोकरी मिळाली होती. काहीजण उच्च शिक्षणासाठी देशाबाहेर चालले होते. माझी नोकरी आणि शेती सुरू होती. नोकरी काही सरकारी नव्हती. ओळखीनं लागलेली. कागदावर नसलेल्या पण तोंडी मान्य केलेल्या अटी पाळाव्या लागायच्या. आजही लागतात. नोकरी टिकवण्यासाठी यांच्या मागेमागे फिरावं लागतं. सभांना जावंच लागतं. पटत नाही, पण घोषणाबाजी करावी लागते. नाहीतर कधी घरी बसवतील याचा नेम नाही.

गाव सोडलेल्या मित्रांचं मात्र माझ्यापेक्षा बरं सुरू आहे. शेड्युल टाईट असतं म्हणतात. पण ड्युटी संपली की ते त्यांच्या मर्जीचे राजे. आमचं तसं नाही. गावात ग्रुप तर इतके झालेत, की बोलता सोय नाही. बरच्या गल्लीचा गट, खालच्या गल्लीचा गट, काँग्रेसचा गट, मनसेचा गट..  गावातला प्रत्येक तरुण कुठल्या ना कुठल्या गटात आहे. गटाला नावं द्यायची, टी-शर्ट छापायचे आणि शायनिंग मारत फिरायचं... बरं करणार तरी काय.. ज्याच्याकडं नोकरी आहे, तो कमीत कमी सात आठ तास तरी कामात असतो. पण गावात उडाणटप्पूच जास्त आहेत. वेळ काढणार तरी कसा...  शहरातल्या मित्रांचं बरं आहे. त्यांचेपण ग्रुप आहेत. पण ते संध्याकाळी वगैरे कोल्ड कॉफी, ब्रेकफास्ट किंवा सिगरेट बिगरेट पिण्यासाठी एकत्र येतात. सुट्टीदिवशी ट्रिप वगैरे काढतात.... 

पण मला सुट्टी म्हटलं की अंगावर काटा येतो... दिवसभर करायचं काय? काय आहे गावात टाईमपासला? वेळ कसा काढायचा? राजकारणात आपल्याला रस नाही.. गावातल्या पोरांना भेटावं म्हटलं तर एकमेकाचा काटा काढण्याशिवाय यांच्या डोक्यात दुसरा विषय नसतो... बरं ग्रुपचं कौतुक इतकं वाढलंय, की दुसऱ्या ग्रुपमधल्या कुणाशी बोलावं तरी पंचाईत. ह्याच्याशीच का बोलत होतास, म्हणून आमच्या ग्रुपवाले जाब विचारणार... तुला काय करायचंय असं म्हटलं, तर साहेबांपर्यंत नाव नेणार... मग सगळ्यांनाच शंका... साहेबांना संशय आला, तर मग नोकरी सोडून बसा घरी... ज्याच्याशी बोललो त्याचीपण गोची. एका गावात राहून लोकांशी बोलायची चोरी झालीय. शहरातल्या मित्रांचं बरं आहे. ते कुणाशी बोलतात यावर त्यांचं पोट अवलंबून नाही... 
                

पण शहरातले मित्र कधीकधी भिकेचे डोहाळे लागल्यासारखं करतात. काल एकजण मुंबईहून गावात आला होता.. टिव्हीत कामाला आहे. बातम्या सांगतो... बोलता बोलता बोलला," तुम्ही गावात राहता. नशीबवान आहात... धावपळ नाही, गोंधळ नाही.. शुद्ध हवा. चांगलं अन्न... ताजं दूध..." त्याला म्हटलं की अख्खा जन्म शहरात गेल्यासारखा फिल्मी बोलू नको.. दिवसभर काय करायचं हा प्रश्न पडत असेल, तर ताजी हवा काय करायचीय? मला म्हणत होता की गावात खर्च पण कमी होतो. आता पैसेच नाहीत पोरांकडं तर खर्च करणार कुठून... गावातल्या पोरांचं शिक्षण बघितलं, तर बीए, बी.कॉम किंवा बी.एस्सी.. याच्यापुढं आणि याहून वेगळं जी शिकली, ती एकतर बाहेर पडली, किंवा त्यांचं बरं सुरू आहे. पण ९० टक्के जनता बीए, बी,कॉम आणि बी.एस्सी. नोकऱ्या मिळणार त्या पण पाच हजार, सात हजार किंवा जास्तीत जास्त दहा हजार.  त्याला पण वशीला पाहिजे...आणि पाच दहा हजारात काय होतंय हल्ली? त्याला म्हटलं लेका तू मिडीयात आहेस, टीव्हीवर दिसतोस, लोक बघतात. पोटापाण्याचं टेन्शन नाही, सगळं सेटल आहे.  म्हणून तुला हे सगळं हवा, अन्न, ताजं दूध बिध आठवतंय. तर मला म्हणाला की गावाची ओढ काय असते, हे गाव सोडून गेल्याशिवाय कळणार नाही. गप्प बसलो. मनात म्हटलं की यांची जळत नाही, म्हणून बोलतायत

मला म्हणाला की मुंबई सोडून गावात राहायला यावं, असं वाटतं. मी म्हणालो आहेस तिथं बेस्ट आहेस. तिकडं कंटाळा आला, की वर्षातनं दोन चारवेळा गावाकडं यायचं... मोकळी हवा घ्यायची... शांत व्हायचं आणि पुन्हा निघून जायचं. यातच भलं आहे. नाहीतर आमच्यासारखी गत होईल... त्याला काही हे पटल्यासारखं वाटलं नाही. पण मित्र म्हणून आपलं काम आहे, खरं काय ते सांगायचं.. जाताना म्हणाला ये एकदा मुंबईला फोन करून.. म्हटलं बघूया. मागच्या वर्षी एकदा गेलो होतो त्याच्या घरी.. पण मुंबईत कुणाकडंही गेलो तरी आपण त्यांना अडचण करतोय असंच वाटतं.. म्हणून जाता जाता त्याला म्हणालो, "तू गावाकडं आलास की तुला परत मुंबईला जाऊ नये, असं वाटतं. पण आम्हाला मात्र मुंबईला आल्यावर कधी एकदा परत गावाकडं येतो, असं होतं."

Sunday, April 10, 2011

मी अँकर बोलतोय


ना मी मालक, ना संपादक
ना तारक, ना मारक मी
वेळेत येतो, वेळेत जातो
आज्ञाधारक अँकर मी.... //धृ//

चेह-यावरती थापुनी मेक-अप
वेळापत्रक करुनी चेक-अप
शिरतो मग मी स्टुडिओमध्ये
जंटलमनचा करूनी गेट-अप
अंगावरच्या कोटाआतील, भुलतो गंजीची भोके मी
हास्य आणतो ओठांवरी, कधी देतो भाव अनोखे मी
वेळेत येतो, वेळेत जातो......१

काय जाहले, जरी मी सध्या
घरात राही भाड्याच्या ?
खडसावूनी या जाब विचारी
अध्य़क्षाला म्हाडाच्या
स्टुडिओमध्ये गुरगुरतो, पण ऑफिसमध्ये शेळी मी
बाता करतो हापूसच्या अन्, घरात खातो केळी मी
वेळेत येतो, वेळेत जातो...... २



पटले वा, ना पटले तरीही
अंगावर घेतो व्हीआयपी
फिरून तरी माझीच मारती
इतुकाही ढळता टीआरपी
विकला गेलो तर मी श्रीफळ, ना विकता मग गोटा मी
प्रायोजक मिळता लेकुरवाळा, ना मिळता वांझोटा मी
वेळेत येतो, वेळेत जातो....... ३

माझ्यासाठी जरी ही भाकर, इतरा मदिरा फसफसली
बोल लावती तेच जयांची, चाखण्या जिव्हा आसुसली
आज्ञा येता विष ओकतो, होतो मिठ्ठाळ पेढा मी
बोलविता कोणी वेदही बोले, ज्ञानोबांचा रेडा मी
वेळेत येतो, वेळेत जातो,
आज्ञाधारक अँकर मी......... ४

अमोल जोशी.

Thursday, February 24, 2011

बसायचे आहे








डोंबिवलीतल्या भागशाळा मैदानावरचा हा फोटो आहे. सगळी बाकडी ज्येष्ठ नागरिकांसाठीच असल्यामुळं वैतागलेल्या काही तरूण मंडळींनी आयडियाची कल्पना लढवत इथल्या काही बाकड्यांवरचा आणि बोर्डांवरचा ‘ज्येष्ठ’ हा शब्दच खोडून टाकलाय.
या मैदानात लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची गर्दी असते. मैदानात दिवसा क्रिकेट आणि रात्री फुटबॉल (प्रकाश कमी असल्यामुळे) खेळ सुरू असतो. बाजूला असणाऱ्या ट्रॅकवरून सकाळी आणि संध्याकाळी अनेकजण पोटासाठी(पोट कमी करण्यासाठी) चालत किंवा धावत असतात. थोडक्यात मैदानावर आणि मैदानाभोवतीच्या ट्रॅकवर अहोरात्र कॅलरीज जळत असतात. मात्र कॅलरीज जाळून झाल्यावर ज्यावेळी इथल्या बाकड्यांवर बसण्याची वेळ येते, तेव्हा मात्र इथल्या तरुणाईचा प्रॉब्लेम होतो. बघावं ते बाकडं ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळं आणि ज्येष्ठ नागरिक आल्यावर उठावंच लागत असल्यामुळं तरुण अनेकदा हिरमुसताना दिसतात. त्यामुळं सौजन्य वगैरे गोष्टींना वैतागलेल्या काहीजणांच्या डोक्यातून आलेली ही बालसुलभ, हतबल आयडिया मैदानात गेल्यागेल्या नजरेत भरते.




या मैदानात किंवा अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी घडणारा नेहमीचा प्रसंग. केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी असं लिहिलेल्या बाकड्यावर काही तरूण मंडळी बसून गप्पा मारतायत. तेवढ्यात एखादे आजी-आजोबा किंवा दोन आजोबा किंवा आज्या तिथं येतात. गप्पा मारणाऱ्या मुलांकडे बघतात. तरुणांना काहीच न बोलता, काही क्षण तिथेच ताटकळतात. मग तरुण आपसूक उठतात आणि त्यांना म्हणतात, “बसा आजोबा. तुमच्यासाठीच हे बाकडं ठेवलंय.” आजोबा बसतात. मग तिथून दुसरीकडे जाताना आजोबांना ऐकू येणार नाही, अशा आवाजात एकमेकांत संवाद “आयला, यांच्यासाठी बाकडी.... आमच्यासाठी कधी बाकडी ठेवणार नाहीत.”





ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची गरज आपल्यापेक्षा जास्त आहे, ज्येष्ठ नागरिकांची प्रत्येक ठिकाणी सोय होणं गरजेचंच आहे, याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण मग आम्ही बसायचं की नाही, की ज्येष्ठ नागरिक होईपर्यंत आम्ही उभंच राहायचं, असा काहीसा हा प्रश्न आहे. शहरांमध्ये पैसे खर्च न करता, फक्त तास दोन तास निवांत बसण्यासाठी तरुणांकडचे पर्याय कमी होत चाललेत. पैसे खर्च करून एखादा मॉल, हॉटेल किंवा कॅफे गाठण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळेच कदाचित ‘बसणे’ हा शब्द मद्यपानाशी जोडला गेला असावा. कारण त्याशिवाय इतर कुठल्याही वेळी गप्पा मारण्यासाठी बसताच येत नाही.

लोकलमध्ये जागा मिळत नाही म्हणून, बसमध्ये चुकून लेडिज सीटवर बसला आणि लगेच एखाद्या महिलेनं उठवलं म्हणून, बागेमध्ये ज्येष्ठ नागरिक आले म्हणून, दुसऱ्या बागेत ‘कपल’ला प्रवेश नाही म्हणून, रेल्वे स्टेशन आणि बसस्टॉपवरची बाकडी कधीच मोकळी नसतात म्हणून तरुणांना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बसण्याची सोय उरलेली नाही. कधी नियमात बसत नाही म्हणून तर कधी सौजन्यात बसत नाही म्हणून, उभंच राहावं लागतं. तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, हे जरी खरं असलं, तरी आताशा पाय खूप दुखायला लागलेत.

Thursday, January 27, 2011

एक सरकारी कार्यक्रम




गेल्या आठवड्यात एका सरकारी कार्यक्रमाला गेलो होतो. सूत्रसंचालक म्हणून. तसा चॅनलच्या डेस्कवर काम करत असल्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांशी हल्ली फारसा संबंध येत नाही. (अर्थात एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याला राजीनामा देण्याची वेळ यावी वगैरे इतकं महान रिपोर्टिंग फिल्डवर असतानादेखील घडलं नाहीच). तर गेल्या आठवड्यात एक फोन आला. "अमोल जोशी बोलताय ना... मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या बदलापूर ऑफिसमधून बोलतोय. आमचा शनिवारी अमूक अमूक कार्यक्रम आहे... त्याचं सूत्रसंचालन करायचं आहे...तुमचं मित्र अमूक अमूक यांनी तुमचा रेफरन्स दिला...(असे रेफरन्स देणाऱ्यांना मी नेहमी पार्टी देतो.) तर तुम्हाला जमेल का?" योगायोगाने त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं मला काहीच अडचण नव्हती... मग कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर पुन्हा फोन आला... कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी साहेबांना तुम्हाला भेटायचं आहे. मी विचारलं, "कशासाठी"? पलिकडून उत्तर - "साहेबांना महत्वाचं बोलायचं आहे." आता कार्यक्रमापूर्वी संयोजकांशी किंवा ज्याची मुलाखत घ्यायची असेल त्याला अगोदर भेटून पूर्वतयारी करावी असे सुप्रसिद्ध सूत्रसंचालकांनी लिहिलेले, सांगितलेले किस्से लक्षात होतेच. मी म्हटलं, "ठीक आहे. येतो उद्या." "स्टेशनवर आलात की फोन करा.. गाडी पाठवतो.."- प्राधिकरण. माझ्यासाठी गाडी पाठवणार म्हटल्यावर नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार, असं वाटलं.

गेलो दुसऱ्यादिवशी... आदल्या स्टेशनवरून फोन केला... "पाच मिनिटांत पोचतोय." "ठीक आहे. मी स्टेशनवरच आहे. वेस्टला बाहेर या. मी उभा आहे. तुम्ही कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय?" "निळ्या रंगाचा". स्टेशनच्या बाहेर गेलो... पांढरा शर्ट, काळी पँट आणि काळा गॉगल घातलेल्या व्यक्तीनं हात केला. ओळखपाळख झाली. मी अमूक अमूक... मी तमूक तमूक... "अच्छा तुम्ही टिव्हीवर असता का... बरं बरं.. कधी बघितल्यासारखं वाटत नाही... हल्ली बातम्या बघायला वेळच मिळत नाही.... अच्छा अच्छा.. हं हं हं... चला मग निघुया..?" आजूबाजूला गाडी तर दिसत नव्हती. त्यानं खिशातनं किल्ली काढली आणि शेजारी उभ्या असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडरला लावली.

ऑफिसमध्ये गेलो... साहेबांच्या केबीनमध्ये गेलो. आता मोजून पाच मिनीटांपूर्वीच मला टिव्हीवर कधीही न बघितल्याचं सांगणाऱ्या त्यानं, त्याची आणि माझी साताजन्माची ओळख असल्याप्रमाणं बॉसशी ओळख करून दिली. "हे अमोल जोशी... साम टिव्हीवर असतात... त्याआधी झी टिव्हीला होते... एकदम फेमस फेस आहे... आपले उद्याचे अँकर..." साहेबांनी चहा मागवला... आता 'महत्वाचं' काम. साहेबांनी कार्यक्रम पत्रिका पुढं ठेवली... बघून घ्या म्हणाले... मी पूर्ण वाचली. मग साहेबांनी एकएक करून महत्वाची कामं सांगितली. "नंबर एक - उद्याचा कार्यक्रम कडक व्हायला पाहिजे. नंबर दोन - कार्यक्रम बरोबर दहाला सुरू होणार... पत्रिकेत छापलेल्यांपैकी काहीजण आले नाहीत, तर त्यांची नावं घेऊ नका. कार्यक्रम पलिकडे आहे. म्हणजे ईस्टला.. मैदानावर.. तुम्ही यांच्यासोबत(हिरो होंडा) जाऊन ठिकाण बघून या. म्हणजे 'अंदाज' येईल. म्हटलं हे सगळं उद्या बोलता येणार नाही. म्हणून आजच सगळं क्लियर असलेलं बरं". मग हिरो होंडावाल्यानं साहेबांच्या देखत आणखी एका महत्वाच्या कामाची आठवण करून दिली. "प्रत्येक भाषणानंतर आणि सत्कारानंतर सारखं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असं म्हणायचं." मी म्हटलं, "बरं. म्हणतो." मग हिरो होंडावरून मैदानात जाऊन कार्यक्रमाचा 'अंदाज' घेतला

दिवस दुसरा.. कार्यक्रमाचा... कार्यक्रम होता दोनच तासांचा. पण मूळ कार्यक्रम पत्रिकेतला आणि आदल्या दिवशी ठरवलेला क्रम आणि प्रत्यक्षात पार पडलेल्या कार्यक्रमाचा क्रम यात केवळ दीपप्रज्वलन आणि आभार हे दोनच कार्यक्रम ठरलेल्या नंबरावर पार पडले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच हिरो होंडा किंवा साहेब सोडून तिसऱ्याच एका अधिकाऱ्यानं माझा ताबा घेतला.... त्याच्या मते प्रमुख पाहुण्यांचा केवळ सत्कार करण्याऐवजी त्यांना अगोदर भाषण करायला लावायच, मग सत्कार करायचा आणि नंतर स्टेजवर बसायला सांगायचं... असं एकएक करून सगळे पाहुणे भाषण करून, सत्कार स्विकारून मग स्टेजवर येतील. मी म्हणालो की काल असं ठरलं नव्हतं आणि हे विचित्र वाटेल. त्यापेक्षा साहेबांना विचारा. थोड्या वेळानंतर साहेब माझ्याकडं आले आणि म्हणाले, "कुणी काही नवं सांगितलं, तर हो हो म्हणायचं. आणि आपलं ठरलंय तसंच करायचं. कुणाला दुखवायचं नाही." आता ठरलंय तसंच करायचं आणि दुखवायचंही नाही, अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी त्यांनी माझ्याकडे दिल्या. तोपर्यंत सव्वादहा वाजले होते.


मग हिरोहोंडावाले माझ्याकडे आले आणि म्हणाले की माईक ऑन करा आणि सूचना द्या की कार्यक्रम सूरू होतोय. सगळ्यांनी खुर्च्यांवर बसून घ्यावं. मी माईकवरून तशा सूचना दिल्या. मग म्हणाले सारखं साऱखं सूचना देत राहायचं. माझ्या सूचनांना कुणीच भीक घालत नव्हतं. तळ्याशेजारी गवत चरणारी म्हैस जशी तळ्यात दगड मारल्यावर फक्त एकदा मान वळवून तिकडं बघते आणि आपलं काम सुरू ठेवते, तितकाच प्रतिसाद मिळत होता. तेवढ्या अर्ध्या तासाच्या काळात आदल्या दिवशी प्लॅन न झालेल्या एक एक गोष्टी मला कळत गेल्या.... उदाहरणार्थ, पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर एका शाळेची टीम लेझीम सादर करणार आहे. निम्मे अधिकारी मैदानाच्या गेटवर उभे आहेत. त्यांच्यासोबतही एक लेझीम पथक आहे. हे पथक प्रमुख पाहुण्यांना वाजतगाजत स्टेजपर्यंत घेऊन येणार आहे. त्याची 'लाईव्ह कॉमेन्ट्री' करायची आहे. प्रमुख पाहुणे बदलले आहेत. इत्यादी. त्यानंतर हिरोहोंडावाले आणि नियोजनात सहभागी असणाऱा प्रत्येक अधिकारी स्टेजच्या बाजूला येऊन मला विचारत होता,"आपलं नाव आहे ना तुमच्याकडं? असेलच म्हणा... पण नंतर घोळ नको म्हणून लिहून घ्या... अ.ब.क." भाषणांची आणि सत्कारांची सोडून इतर नावं कुठंही येण्याची शक्यता नव्हती. पण दुखवायचं नव्हतं. लिहून घेतली नावं. अखेर पाहुणे आले.. लेझीम पथक राहिलं मागे आणि पाहुणे स्टेजवर पोचलेसुद्धा... मग स्वागत झालं. मग लेझीम झालं. सत्कार झाले. भाषणं झाली... सगळं झालं. कार्यक्रम संपला.


निघताना हिरो होंडाला भेटलो. म्हणाला, "पुढच्या वेळी जरा अजून तयारी करून या!"