Sunday, December 30, 2012

शांतता! टीआरपी बंद आहेत...



      बसनं वेग घेतला. सूर्य मावळतीला चालला होता. त्याची तिरपी किरणं खिडकीतून आत येऊन बसभर पसरली होती. बसमध्ये होते पत्रकारितेचे विद्यार्थी आणि त्यांचे दोन प्राध्यापक. ही एज्युकेशन ट्रीप चालली होती मुंबईला. मराठी न्यूज चॅनल पाहायला. बसच्या वाढत्या वेगासोबत आत घुसणारे थंड वारे विद्यार्थ्यांना अजूनच पॅशनेट करत होते, तर प्राध्यापकांना अंतर्मुख. थंड वाऱ्याच्या झुळुका चेहऱ्यावर घेत, डोळे मिटून, आपण एखादी मोठी बातमी ब्रेक करून त्यावर लाईव्ह देत उभे असल्याची स्वप्नं विद्यार्थी पाहात होते. रात्री एका हॉटेलवर गाडी थांबली तेव्हा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एकत्र बोलावलं आणि दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाबाबत सूचना द्यायला सुरुवात केली. उद्या सकाळी आपण मुंबईत पोचू. दुपारी बारा वाजता आपण चॅनलमध्ये जाणार आहोत. चॅनलमध्ये गेल्यावर काय करायचं, कसं वागायचं आणि महत्वाचं म्हणजे कसं वागायचं नाही, याच्या सूचना मी तुम्हाला निघण्याअगोदरच दिलेल्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट. उद्या बुधवार आहे. कुठल्याही चॅनलसाठी बुधवार हा सर्वात महत्वाचा दिवस असतो. त्यामुळंच खास बुधवारीच न्यूज चॅनल्समधलं वातावरण बघता यावं, हा आपल्या एज्युकेशन ट्रीपचा हेतू आहे. पण त्यासाठी तुम्हाला सांभाळूनच वावरावं लागेल. बुधवारी चॅनलमधल्या कुणाचा मूड कसा असेल, याचा अंदाज करता येत नाही. एखादा आनंदानं तुम्हाला मिठी मारेल, तर दुसरा शिव्या देऊन तुम्हाला हाकलूनही देऊ शकतो. हिंसकही होऊ शकतो. तेव्हा सावधान.
      कट टू बुधवारी दुपारी 12 वा. गेटवरच्या नावनोंदणी, पास वगैरे औपचारिकता पूर्ण करून भावी पत्रकार आतमध्ये आले. इतक्या लांबून आलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण ऑफिस फिरून, सगळे विभाग दाखवण्याची जबाबदारी एका सिनीयर आणि लोकप्रिय एँकरवर सोपवण्यात आली. प्राध्यापकांच्या मनात पहिली शंकेची पाल इथंच चुकचुकली. आपण पोचण्यापूर्वीच चॅनलमध्ये काहीतरी राडा झाल्याची शंका बळावली. इतक्या वर्षांत चॅनलमधील सर्वात नव्या आणि कमी महत्वाच्या व्यक्तीकडं येणारी ही जबाबदारी अचानक या सिनीअर अँकरकडं का यावी? पण अशी शंका जाहीरपणे विचारणं औचित्याला धरुन होणार नाही, असं वाटल्यामुळं प्राध्यापकांनी ही शंका मनातच गिळली. शिवाय सिनिअर असूनदेखील अँकरच्या बोलण्या वागण्यात असलेला साधेपणा प्राध्यापकांच्या नजरेतनं सुटला नव्हता. काहीतरी बिनसलंय हे तेव्हाच त्यांनी ताडलं.
अँकर विद्यार्थ्यांना घेऊन अगोदर स्टुडिओमध्येच गेला. हा स्टुडिओ. इथं सतत, 24 तास काही ना काही सुरू असतं. आमचा जो आवाज तुम्ही टिव्हीवर ऐकता, तो इथून बाहेर पडतो. इथं सतत किमान एक कॅमेरामन हजर असतो. जरी रिपीट बुलेटिन असलं, तरी तो इथून हलत नाही. सध्या तो इथंच कुठंतरी असेल. पण इथलं वातावरण सतत धावतं असतं. फारफार तर अर्धा तास वगैरे स्टुडिओ शांत असतो. मग पुढचं बुलेटिन लगेच सुरू होणार आहे का सर?” एक चौकस विद्यार्थी. नाही. आता पुढचं बुलेटिन थेट 2 वाजता. आत्ता एक कार्यक्रम सुरू आहे. एरव्ही अशा महत्वाच्या वेळी कुणी सलग दोन तासांचा कार्यक्रम वगैरे टाकत नाही. पण सध्या तो सुरू आहे. रिस्क आहे. पण नवे प्रयोग करण्याची अशी संधी चॅनलला परत मिळणार नाही ना!” का?” भावी शोध पत्रकारानं विचारलं. नंतर सांगतो. चला पुढं. असं म्हणून अँकरनं सगळ्यांना स्टुडिओतून बाहेर काढलं आणि शेजारीच असलेल्या पीसीआर (पॅनल कंट्रोल रुम) मध्ये घेऊन गेला. कंट्रोल रुम या नावावरनंच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथून सगळं कंट्रोल होतं. पण इथल्या लोकांवर कुणाचंच कंट्रोल नसतं. इथं होणाऱ्या आरड्याओरड्याचं टीआरपीशी समप्रमाण आहे. त्यामुळं आरडाओरडा हा भेसूर शब्द इथं मात्र गौरीप्रमाणं सोन्यामोत्याच्या पायांनी येतो. आठवडाभर इथं आरडाओरडा झाला नाही, तर मग बुधवारी तिथं होतो. तिथं म्हणजे कुठं विचारू नका. असं म्हणून त्यानं तिथल्या तोबरा भरलेल्या कर्मचाऱ्याला डोळा मारला. पण मग इथं सध्या एवढी शांतता का?” एका भावी तर्क-पत्रकारानं विचारलं. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे सध्या लाईव्ह बुलेटिन सुरू नाही. आणि दुसरं कारण शेवटी सांगतो. चला पुढं.
      या असे. समोरच्या दारातनं एक क्रिएटिव्ह राईट टर्न घ्या आणि समोर पाहा. हे ग्राफीक्स आणि ऍनिमेशन डिपार्टमेंट. अँकरनं माहिती दिली. तिथं सुरु असणारा गोंधळ, गप्पा, जोक्स पाहून विद्यार्थ्यांना हायसं वाटलं. निदान ग्राफिक्स विभागात तरी सर्वकाही आलबेल असल्याचं पाहून त्यांच्या मावळत चाललेल्या उत्साहाला पुन्हा उभारी मिळाली. तिथल्या एकदोन कर्मचाऱ्यांनी तर आपल्या खुर्च्या प्राध्यापकांना दिल्या आणि स्वतः बाहेर निघून गेले. गेल्या सहा वर्षांत असं सौजन्य प्राध्यापक पहिल्यांदाच पाहात होते. अजून किती दिवस रिलॅक्स रे?” अँकरनं ग्राफीक्समधल्या एकाला विचारलं. बहुदा पुढचा एक किंवा दोन आठवडे असतील. नक्की माहिती नाही. पण आठवडा असला, तरी चिक्कार झालं. विद्यार्थ्यांप्रमाणं प्राध्यापकांनीही मनातल्या मनात या संभाषणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. पण कुणालाच काही कळालं नाही. हे असं जीवंत ग्राफीक्स डिपार्टमेंट मीदेखील एवढ्या वर्षांत आत्ताच बघतोय बरंका. एरव्ही इथल्या माणसांची उंची किती असावी, हेदेखील अंदाजानंच ओळखावं लागतं. केवळ येताना आणि जातानाच इथले कर्मचारी दोन पायांवर उठून उभे राहतात. एरव्ही इथं चिडीचूप शांतता असते. एकामागून एक ग्राफीक्स प्लेट्स, तुम्हाला दिसणाऱ्या विंडोज वगैरे करण्यातून यांना मान वर करून बघणंदेखील शक्य नसतं. पण सर, मग आज असं काय झालंय?” एका फॉलो अप पत्रकारानं विचारलं. अजून एक महत्वाचं ठिकाण दाखवायचंय. त्यानंतर सांगतो. अँकर.
      अँकर विद्यार्थ्यांना घेऊन न्यूजरुममध्ये गेला. न्यूजरुममधलं वातावरण पाहून पोरांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आजवर प्राध्यापकांनी जे सांगितलं, ऐकवलं, ते सगळं खोटं होतं, याची विद्यार्थ्यांना खात्रीच पटली. भर बुधवारसारख्या बुधवारी न्यूजरुममध्ये कुणीही घाईत नव्हतं, कुणी कुणाची आई किंवा बाप काढत नव्हतं. नजरेनं ओळखता येणारे सीनिअर्सही हसतखेळत काम करत होते. एका भींतीवर लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होत होत्या. ब्रेकिंग न्यूज असूनही त्यात व्याकरणाच्या चुका दिसत नव्हत्या. दुसऱ्या एका ब्रेकिंग न्यूजवर काम आणि चर्चा सुरू होती. तीदेखील अत्यंत शांतपणे. बायकोनं संपलेल्या किराणा सामानाची यादी सांगावी आणि नवऱ्यानं शांतपणे ती कागदावर उतरवून घ्यावी, त्याप्रमाणं एक तरुणी बातमी सांगत होती आणि दुसरा तरुण ती टाईप करत होता. सर, ही ब्रेकिंग न्यूज कशी देतात?” एका बोल-पत्रकारानं विचारलं. हा तर आपल्यापेक्षाही बेसिक प्रश्न विचारतो, असं अँकरच्या मनात आलं आणि तो सगळ्यांना थोडं पुढं घेऊन गेला. सध्या तुम्ही पाहताय, ती न्यूज चँनलमधली सगळ्यात गोंधळाची, गडबडीची आणि महत्वाची जागा. हे असाईनमेंट डेस्क आणि त्याशेजारी हे आऊटपूट. या सगळ्याला एकत्रितपणे न्यूजरुम असं म्हणतात. सर्वात अगोदर इनपूटकडं बातमी येते आणि लगेच ती आऊटपूटकडं जाते. मग इथं बसलेला व्यक्ती ती या पीसीवर टाईप करतो आणि त्याची ब्रेकिंग न्यूज होते. अशा एकामागून एक ब्रेकिंग न्यूज येत असतात. किंबहूना त्या याव्या लागतात. म्हणजेच त्या आणल्या जातात. त्यामुळं इथल्या लोकांवर प्रचंड दबाव असतो. दबाव सहन न झाल्यामुळं लोक आतून धुमसत असतात. त्यामुळं सर्वात जास्त शिव्याही इथंच जन्माला येतात. अँकर श्वास घेण्यासाठी थांबला. पण मग आत्ता असं वातावरण का नाहीए?” एक भावी शौर्य पत्रकार उद्गारली. अँकर म्हणाला, चला बाहेर. सांगतो गेटवर.
      अँकरच्या तोंडून गेटची भाषा निघताच आपली निरोपाची वेळ आल्याचं चतुर प्राध्यापकांनी ओळखलं. अँकरला शेकहँड करून ते म्हणाले, थँक्यु. यावेळी तुम्ही स्वतः वेळ काढून आम्हाला चॅनल दाखवलंत त्याबद्दल. संपादकांनाही धन्यवाद सांगा. अहो, तुम्हीच सांगा की त्यांना स्वतः भेटून अँकरनं प्रस्ताव ठेवला. हे ऐकून तर एसीतही प्राध्यापकांना घाम फुटला. काहीतरी भयंकर आणि विपरित घडल्याच्या शंकेवर जवळपास शिक्कामोर्तबच झालं होतं. गेल्या चारही वर्षी अगोदर निरोप देऊनही मिटींगमध्ये बिझी असणारे संपादक आज खरोखर भेटायला तयार असल्याची कल्पनाही प्राध्यापकांना असह्य होत होती. काही क्षणांत समोरून स्वतः संपादकच येताना दिसल्यावर प्राध्यापकांच्या चष्म्याआड धुकं साठायला सुरुवात झाली. संपादक आले. हसले. विद्यार्थ्यांशी काहीबाही बोलले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. अखेर विद्यार्थ्यांचे प्रश्न संपले तरीही संपादकांना निघण्याची कुठलीच घाई दिसत नव्हती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या रुपानं आयता प्रेक्षकवर्ग समोर उभा असताना त्यांनी इतर चॅनलचा उद्धारही केला नाही किंवा आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याची विनाकारण जाहीर खरडपट्टी काढून आपण संपादक असल्याची खातरजमाही करून घेतली नाही. प्राध्यापकांनी स्वतःला चिमटा काढून पाहिलं. कसंबसं सावरत घायाळ प्राध्यापक आणि अचंबित विद्यार्थी गेटवर पोचले. सगळ्यांच्या नजरेतला प्रश्न अँकरला नेमका कळला होता. त्यानं उत्तर दिलं, ऑक्टोबर महिन्यापासून न्यूज चॅनल्सचे टीआरपी येत नाहीएत. ते डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यापासून पुन्हा सुरु होतील. त्यामुळं इथल्या प्रत्येकाच्या आय़ुष्यातली सगळ्यात मोठी दिवाळी सध्या सुरू आहे. काही महिन्यांतच ती संपतेय. आणि मग सुरू होणार आहे इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शिमगा....

(दै. दिव्य मराठीच्या 29 डिसेंबर 2012 च्या अंकात प्रकाशित)