चर्चा ऐन रंगात आली होती. दोन्ही पक्षाचे प्रवक्ते हिरीरीनं आपली बाजू मांडत होते. एकाचे आरोप, दुसऱ्याची उत्तरं, तिसऱ्याचे नवे आरोप, चौथ्याचं विश्लेषण.... सगळ्यांचे स्वर टीपेला पोचले होते. कुणीच कुणाला जुमानत नव्हतं. स्टुडिओतल्या चौघांपैकी एकालाही इतर तिघांचा मुद्दा पटत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरच्या आक्रमकपणाची जागा आता त्वेषानं घेतली होती. ब्रेकची वेळ उलटून चालली होती. ‘ब्रेक.. ब्रेक.. ब्रेक...’ पॅनल प्रोड्युसर घशाच्या शिरा ताणून ओरडत होता. आपणदेखील ब्रेक घेण्यासाठी योग्य संधीच्याच शोधात होतो. अखेर एका प्रवक्त्याच्या तानेलाच सम मानून आपण ब्रेकसाठीचं वाक्य उचललं आणि प्राणायम करताना कोंडून ठेवलेला श्वास सोडल्यानंतर मिळतो, तसा सुटकेचा दिलासा मिळाला. आपल्या आयुष्यातल्या पहिल्या टॉक शोचा पहिला सेगमेंटच इतका वादळी झाल्यामुळं काय धीर आला होता आपल्याला! पण त्याचवेळी एक अवघडलेपणसुद्धा आलं होतं. इतक्या तावातावानं भांडणारे हे चौघे आता ब्रेकमध्ये काय करणार याचं. एकमेकांवर संतापलेल्या चौघांनी ब्रेकमध्ये अबोला धरला, तर तीन-चार मिनीटांचा वेळ काढायचा कसा? अशावेळी ब्रेकमध्ये काय करायचं असतं, हे कुणाला तरी विचारून घेतलं असतं, तर बरं झालं असतं. आता सगळे गप्प बसले, तर अवघडल्यासारखं होणार आणि पुन्हा भांडायला लागले, तर तारांबळ उडणार. ब्रेकचं वाक्य उच्चारता क्षणी या विचारांनी आपल्याला धडकी भरवली होती. प्रत्यक्षात जे घडलं, ते मात्र कल्पनेच्याही पलिकडचं होतं. “आज बरी तयारी दिसतेय तुमची” असं म्हणत विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यानं सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याला टाळी दिली आणि पलिकडं बसलेल्या राजकीय विश्लेषकाला डोळा मारला. तर सत्ताधारी प्रवक्त्यानं “ करतानाच इतक्या तयारीनं करतो, की बोलताना वेगळ्या तयारीची गरज लागत नाही’, असं म्हणत हशा पिकवला होता. विजयला दिवाळीच्या पहाटे घरी बसून फराळ करता करता हा प्रसंग आठवला. न्यूज चॅनलला अँकर म्हणून रुजू झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी विजय दिवाळीदिवशी घरी होता. गेले चारही दिवाळसण त्यानं बातम्या देत आणि मूळच्या मुंबईकर असणाऱ्या सहकाऱ्यांनी घरून आणलेले फराळाचे पदार्थ खात खातच घालवले होते. आता मात्र तो सिनीयर होता. दिवाळीचे तीनही दिवस सुट्टी मिळणं, हीच सिनीयर असल्याची पावती होती. फराळ संपवून विजय घराच्या गच्चीवर आला. मुंबईच्या दमट हवेची सवय झाल्यामुळं गावातल्या हवेची झुळूक त्याला अधिकच थंड वाटली. सूर्य वर येऊ लागला होता. उगवत्या सूर्याकडं विजय पाहतच राहिला. गेल्या पाच वर्षांत हा क्षण त्यानं पाहिलाच नव्हता. चॅनलचा प्राईम टाईमचा अँकर असल्यामुळं तो सेकंड शिफ्टलाच यायचा. रात्री घरी पोचायचा दोन वाजता. झोपता झोपता तीन वाजायचे. मग कसला सूर्योदय पाहणार? झोपेतून जागा व्हायचा, तेव्हा पहिली दोन वर्षं रूम पार्टनर आणि त्यानंतर बायको, ऑफिसमध्ये पोचलेले असायचे. नेहमीप्रमाण त्या दिवशीदेखील तो 10, 10.30 ला जागा झाला होता. पावसाळ्याचे दिवस होते. झोपेतून जाग येताच, त्या दिवसाचं शेड्युल त्याच्या डोळ्यापुढं आलं. आज गुरुवार. रोजच्यासारखाच एक दिवस. पण उद्याचा दिवस थोडा वेगळा असेल. उद्या दहीहंडी. दिवसभर लाईव्ह कव्हरेज. वा. अँकरिंग करत दिवसभर स्टुडिओतूनच हंड्या पाहायच्या. त्याहीपेक्षा सेलेब्रिटी, त्यांचे डान्स वगैरे वगैरे. तेवढाच चेंज. पण यंदाची दहीहंडी साधी असणार. असणार म्हणजे काय असायलाच हवी. स्वाईन फ्लूनं थैमान घातलंय. दहिहंडीसाठी जमणाऱ्या गर्दीतून स्वाईन फ्लू किती पसरेल! कालच तर याविषयीच्या बातमीचा आपण ‘व्हॉईस ओव्हर’ केला होता. असो. आज दिवसभर बहुदा याच विषयावर खेळावं लागणार. विचार करता करता त्याचा पुन्हा डोळा लागला आणि जाग आली तेव्हा दीड वाजत आला होता. झटक्यात अंथरुणातून उठून त्यानं आन्हिकं उरकली आणि ऑफिसमध्ये पोचला. दिवसभर चॅनेलच्या बातम्या दहिडंडीभोवतीच फिरत राहिल्या. रात्रीच्या टॉक शोलाही याच विषयावर चर्चा होती. मोठा दहिहंडी उत्सव भरवणारे, तीन वेगवेगळ्या पक्षांचे नेते चर्चेसाठी येणार होते. तिघांनाही चांगलंच फैलावर घ्यायचं ठरवून विजयनं शो सुरु केला. पहिला प्रश्न विचारला, “स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग असल्यामुळं तो फैलावण्याची शक्यता नाही, तर खात्रीच आहे. याची कल्पना असतानाही दहीहंडी उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित करणं योग्य आहे का?” अगदी हाच प्रश्न अपेक्षित असल्याप्रमाणं तिघांनीही आपापली उत्तरं दिली. तिघांच्याही उत्तरातला समान मुद्दा होता, गोविंदाना मास्क पुरवणार असल्याचा. या उत्तरानं समाधान न झालेल्या विजयनं तिघांनाही टोचायला सुरुवात केली. त्यातल्या त्यात नवख्या आणि शामळू वाटणाऱ्या नेत्याला त्यानं जास्तच टार्गेट केलं. “आपल्याकडे अँटि व्हायरस आहे म्हणून कॉम्प्युटरमध्ये मुद्दाम व्हायरस टाकण्यासारखा हा प्रकार नाही का?”, “सर्पदंशाचं औषध आहे, म्हणून उगाच सापाचा दंश करून घेण्यात कसलं शहाणपण आहे?” वगैरे प्रश्न विचारून त्यानं तिन्ही आयोजकांची एकप्रकारे उलटतपासणीच सुरू केली. त्यातल्या नवख्या आयोजकाच्या कपाळावरील आठ्या वाढू लागल्या. त्यानं शेवटी चिडून विजयला विचारलं होतं, “तुम्हाला जर इतकं भान आहे, तर आमचा दहिहंडी सोहळा दिवसभर लाईव्ह कव्हर करण्यासाठी तुमच्या चॅनलनं डिल केलंच कशासाठी?” यावर निरुत्तर झालेल्या विजयनं आपला गोंधळ यशस्वीपणे लपवत ब्रेक घेतला होता. पहिल्याच ब्रेकमध्ये, संपादकांनी फोनवरून प्रॉड्युसरला दिलेली सूचना, टॉकबॅकवरून विजयच्या कानात सांगण्यात आली होती. त्यानंतरची चर्चा दहिहंडीचं सांस्कृतिक महत्व आणि बदलत्या काळात दहिहंडी उत्सवात येत चाललेलं नावीन्य या विषयांवर रंगली. ब्रेकमध्ये त्यातल्या एका नेत्यानं विजयला विचारलं होतं, “नवीन आहात वाटतं?” आणि तिघंही एकमेकांकडं बघून हसले होते. एखाद्या गुन्हेगाराविरुद्ध केस जिंकत आलेल्या वकिलाला, ऐन वेळी, त्या गुन्हेगाराच्या बाजूनं लढावं लागलं, तर जसं वाटेल, तसं विजयला वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी, सकाळपासून रात्रीपर्यंत, त्याच्या सहकारी अँकर्ससोबत तो दहिहंडी उत्सवाची लाईव्ह कॉमेंट्री करत होता. अमूक थराची हंडी, इतक्या थरांना तितकं बक्षीस, कोण सेलेब्रिटी कुठल्या गाण्यावर थिरकतोय किंवा थिरकतेय, स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आयोजकांनी नेमकी काय काळजी घेतलीय वगैरे मुद्द्यांवर दिवसभर त्याची बॅटिंग सुरू होती. ब्रेकमध्ये मात्र तो आयोजकांचा दांभिकपणा आणि आर्थिक बाजू सावरण्यासाठी चॅनलला कराव्या लागणाऱ्या तडजोडीविषयी ‘पीसीआर’मध्ये बसलेल्या त्याच्या सहकाऱ्यांशी बोलायचा. त्याच्या ऑन एअर बरं आणि ब्रेकमध्ये खरं बोलण्याच्या धोरणामुळं कुणाचंच ‘व्यावसायिक’ नुकसान होणार नव्हतं.
पुढंपुढं हेच धोरण विजयच्या अंगवळणी पडत गेलं होतं. बुलेटिन्स आणि टॉक शोमध्ये साचत राहिलेलं, तो ब्रेकमध्ये रितं करत होता. त्याच्या इतर सहकाऱ्यांचीही अशीच अवस्था होती. ‘न्यूज ब्रॉडकास्टिंग’ हे धर्मयुद्ध असेल, तर ब्रेक हा कन्फेशन बॉक्स होता. ब्रेक या घटकाबद्दल विजयचा आदर दिवसेंदिवस वाढत होता. ‘कर्मचारी असो वा संस्था, कोंडी सोडवून मोकळा श्वास घेण्याची ‘गरज’ पूर्ण करणारी संधी म्हणजे ब्रेक’ अशी ब्रेकची व्याख्या विजयनं तयार केली होती. त्याचा ब्रेकशी असणारा लळा दिवसेंदिवस वाढत होता. रोजच्या टॉक शोमध्ये येणारे पक्षाचे प्रवक्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक त्याच्या खास ओळखीचे झाले होते. सुरुवातीच्या काळात असणारी औपचारिकता कमी होत होती. घोटाळे, धोरणं, शह-काटशह यावर रोज रात्री सडेतोड चर्चा घडत होत्या. अशा चर्चांना विजय इतका सरावला होता, की आज कुठला प्रवक्ता काय बोलेल, हे तो पैजेवर सांगायचा. केवळ विजयच नव्हे, तर रोजच्या चर्चांमध्ये भाग घेणाऱ्या प्रवक्त्यांनादेखील इतर प्रवक्त्यांचे मुद्दे माहित असायचे.
एकदा असंच झालं. कुठल्याशा राजकीय विषयावर त्या रात्री चर्चा होती. सत्ताधारी प्रवक्ता स्टुडिओत होता, तर विरोधी प्रवक्ता, त्याच्या कार्यालयातून ‘ओबी’वरून सहभागी होणार होता. शो सुरु होण्यापूर्वी विजयनं त्याच्या प्रॉड्युसरला बाहेरून सहभागी होणाऱ्या प्रवक्त्याविषयी विचारलं. टॅफिकमुळं ओबी व्हॅन उशीरा पोचल्याचं विजयला समजलं. तो प्रवक्ता कनेक्ट व्हायला अजून काही मिनीटं लागणार असल्यामुळं, त्याच्याशिवायच शो सुरू करणं अपरिहार्य होतं. काऊंटडाऊन सुरू झालं, ओपनिंग मोंताज पडला, टॉक शोची स्टिंग ऑन एअर गेली आणि विजयनं शोला सुरुवात केली. विरोधी पक्षाचे प्रवक्ते काही वेळातच सहभागी होणार असल्याचं सांगून त्यानं सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यापासून चर्चेला सुरुवात केली. त्या प्रवक्त्यानंदेखील विरोधी प्रवक्ता उशिरा येणार असल्याचा फायदा घेत, विरोधक कुठल्या मुद्द्यांचं भांडवल करू शकतात आणि त्यासाठी कुठले बाळबोध संदर्भ देऊ शकतात, याची एक यादीच बोलून दाखवली. त्यानंतर डाव्या पक्षाचा प्रवक्ता बोलत असताना विरोधी प्रवक्ता ‘कनेक्ट’ झाल्याचं विजयला सांगण्यात आलं. विजयनं जेव्हा त्यांना विरोधाचं कारण विचारलं, तेव्हा त्या प्रवक्त्यानं तेच मुद्दे, त्याच संदर्भांसहित मांडायला सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी आणि डावा प्रवक्ता छद्मीपणे हसू लागले. विजयला मात्र समजेना की सत्ताधारी प्रवक्त्याच्या अचूक अंदाजाला दाद देत हसावं, की विरोधकानं चेहऱ्यावर ओढलेल्या तळमळीला गंभीरपणे मान डोलवावी. त्यानंतर ब्रेकमध्ये विजयला समजलं की विरोधी प्रवक्त्यानं दुसऱ्या चॅनलवर केलेल्या अपमानाचा, सत्ताधारी प्रवक्त्यानं संधी साधत घेतलेला हा ‘बदला’ होता. प्रश्न रोजचाच असल्यामुळं, एका विशिष्ट मर्यादेपलिकडं आक्रमक होणं, दोघांनाही कसं महागात पडू शकतं, याची जाणीवच त्या प्रवक्त्यानं करून दिली होती. ब्रेकनंतर पुढच्या सेगमेंटमध्ये मात्र त्यानं विरोधी प्रवक्त्याला अलगद सावरलं. या शोला येण्यापूर्वीच कशी आमची अनौपचारिक चर्चा झाली होती, तेव्हाच त्यांनी त्यांचे मुद्दे कसे खुल्या दिलानं मांडले होते, वगैरे भाष्य करत त्यानं विरोधी प्रवक्त्याचा केलेला ‘पोपट’ थोडा कमी करण्याचा प्रयत्न केला होता.
‘ऑन एअर’ जाणाऱ्या जवळपास सगळ्याच गोष्टी विजयसाठी आता ‘प्रेडिक्टेबल’ झाल्या होत्या. उत्सुकता वाटायची ती केवळ ब्रेकची. अनेक घोटाळ्यांचे खरे सूत्रधार, कुणाच्या खिशात किती कोटी गेले, कोण कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारतोय या सगळ्याचे इत्यंभूत तपशील त्याला ब्रेकमध्येच मिळायचे. ‘ऑन एअर’ एकमेकांना कोंडित पकडणारे राजकीय नेते ब्रेकमध्ये मात्र ‘को-ऑपरेटिव्ह’ असायचे. कुठल्याही पक्षानं नेमलेला नवा प्रवक्ता, सुरुवातीचे काही दिवस पक्षीय अभिनिवेषात राहायचा. ऑन एअर असणारं बेअरिंग तो ब्रेकमध्येही धरून ठेवायचा. नंतर एखाद्या दिवशी, ब्रेक सुरू असताना, आपल्या माईकवर हात ठेऊन विचारायचा, “हे रेकॉर्ड तर होत नाहीए ना?” आणि बेरकीपणानं एखादं सोयीचं सत्य सांगून टाकायचा. दिवसभरातल्या औपचारिक धबडग्यात ब्रेक हीच सत्याचं दर्शन घडवणारी जागा होती.
चॅनलवरची बातमीपत्रं आणि वादविवादांचे कार्यक्रम विजयचं करिअर घडवत होते, तर या कार्यक्रमांतले ब्रेक त्याला समृद्ध करत होते. ब्रेकमध्ये त्याला नागवं सत्य भेटत होतं आणि त्याचा नाद विजयला वेडावून सोडत होता. दिवसागणिक ब्रेकमध्ये येणारे अनुभव नवनवे असत. गेल्या जुलै महिन्यात त्याला आलेला अनुभव तर अधिकच धक्कादायक होता. महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. जुलै महिना सुरू झाला, तरी पावसानं हजेरी लावली नव्हती. त्या रात्री चॅनलवर दुष्काळाच्या विषयावर चर्चा होती. सत्ताधारी, विरोधक, राजकीय विश्लेषक, कृषीतज्ज्ञ असा लवाजमा एकत्र करून चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या भागातल्या गरमागरम चर्चेनंतर ब्रेक झाला. ब्रेकमध्ये नेहमीप्रमाणं सगळे नॉर्मलला येतील, असा अनुभवसिद्ध अंदाज विजयला होता. त्याच्या अंदाजाप्रमाणं इतर सर्वजण नॉर्मलला येऊन गप्पांमध्ये रंगलेदेखील. मात्र सत्ताधारी आमदार शांत होता. त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून, त्याच्या मनात काहीतरी निर्णायक शिजतंय, याचा अंदाज येत होता. विजय सहजच म्हणाला, ‘अहो साहेब, ब्रेक सुरू आहे. इतकं शांत बसण्याची गरज नाही’. त्यानंतर अचानक भानावर आल्यासारखा तो म्हणाला, ‘विजय, आमच्या सरकारनं खरंच चुका करून ठेवल्यात. त्या जनतेसमोर यायलाच पाहिजेत. तुम्ही मला हे तीन-चार महत्वाचे प्रश्न विचारा. या सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं देणं सरकारसाठी सोयीचं नाही. मात्र या मुद्द्यावरून सरकार अडचणीत येऊ शकतं, हे तरी वरिष्ठांना आणि मंत्र्यांना कळेल.” त्यानंतर विरोधी प्रवक्त्यालाही त्या आमदारानं असे चार-पाच मुद्दे दिले, जे सत्ताधाऱ्यांच्याच विरोधात जाणारे होते. ब्रेक संपला. त्या नेत्यानं दिलेले मुद्दे घेऊन विजय आणि विरोधक दोघंही तुटून पडले. तोदेखील या प्रश्नांची उत्तरं टाळून, लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न करत राहिला. शो हिट ठरला. संपादकांनीही ‘अभ्यासपूर्ण’ प्रश्न विचारल्याबद्दल विजयची पाठ थोपटली. मात्र एखाद्या नेत्यानं स्वतःलाच अडचणीत आणणारे मुद्दे आपल्याला आणि विरोधकांना का पुरवावेत? हा प्रश्न मात्र विजयच्या मनात घोळत राहिला. त्याचं उत्तर पुढच्याच आठवड्यात त्याला मिळालं. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत ‘त्या’ आमदाराचा तालुका घेतला नव्हता. या शोनंतर आठवडाभरात आलेल्या दुसऱ्या यादीत मात्र त्याच्या तालुक्याचं नाव समाविष्ट झाल्याचं विजयच्या ध्यानात आलं आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ब्रेकचा उपयोग आपल्यापेक्षा राजकारणीच अधिक सराईतपणे करून घेऊ शकतात, हे त्यानं मनोमन कबूल केलं होतं.
मागच्या पाच वर्षांचा हिशेब काढला, तर विजयनं केलेल्या बुलेटिन्स आणि शोजची संख्या शेकडोंच्या घरात होती. मात्र आज यातलं काहीच त्याला आठवत नव्हतं. किंबहूना, लक्षात राहावं, असं ‘ऑन एअऱ’ काहीच घडलंच नव्हतं. आठवत होते ते सगळे ब्रेकमधले किस्से, ब्रेकमधले खुलासे, ब्रेकमधल्या ब्रेकिंग आणि खऱ्या अर्थानं एक्सक्लुजीव न्यूज. सततचं लाऊड प्रेझेंटेशन आणि आरोपांच्या चिखलफेकीच्या वांझ बातम्यांमधून त्याला मानसिकदृष्ट्या टिकवून ठेवलं होतं ब्रेकनं. विजयच्या मनात नेहमी विचार चालायचे, “सत्याच्या उत्कंठेपायी आपण पत्रकारितेत आलो. ही उत्कंठा पूर्ण होत गेली केवळ ब्रेकमध्येच. ब्रेकनंच आपल्याला शहाणं केलं. समंजस, व्यवहारी बनवलं. ‘ऑन एअर’ जो केला, तो केवळ सराव होता, खरं कसब मिळवून दिलं, ब्रेकनीच. बातम्या आणि चर्चा या केवळ ‘रचना’ होत्या. त्या रचनांचं रसग्रहण ब्रेकमध्येच झालं. ब्रेकमध्ये आपण किती खरे असतो! खरोखर आश्चर्यचकित होतो. खरेखुरे थक्क होतो आणि कुठलाही फिजिकल स्टान्स न घेताही अंतर्मुख होतो.”