Tuesday, December 2, 2014

स्वांड्या - एक किस्सा



   



          आज मयऱ्यानं अबिदा परवीनची एक गझल पाठवली. व्हॉट्स ऍपवर. तेरे आनेका धोखा सा रहा है, दिया सा रातभर जलता रहा है. ऑफिसमधून परत येताना लोकलमध्ये व्हॉट्स ऍपवर आलेले मेसेजेस चाळत होतो. त्यावेळी पुन्हा एकदा त्या गझलकडं लक्ष गेलं. बॅगेतून हेडफोन लावून गझल ऐकू लागलो. माझं असं आहे की कुठलंही गाणं ऐकताना ते एखादी व्यक्ती, परिस्थिती, ठिकाण, वास, आठवण यापैकी कशा ना कशाशी रिलेट होतं. आजवर बऱ्याचदा ऐकलेली ही गझल आज रिलेट झाली ती स्वांड्याशी. स्वानंद कुलकर्णी.
      स्वांड्याला जाऊन आज किती दिवस झाले, हा मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे की प्रत्येकवेळी त्याची आठवण आल्यावर तो गेलाय याची नव्यानं आठवण होत राहते. म्हणजे असं की प्रत्येकवेळी अगोदर स्वांड्या आठवतो आणि नंतर क्षणार्धात तो मेला आहे, हे आठवतं. मेलेला स्वांड्या आठवत नाही. नुसता स्वांड्या आठवतो आणि त्याला लागूनच, तो मेल्याची जाणीव.
सतत ऍक्टिव्ह असलेल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर डीपी म्हणून स्वांड्याचा फोटो आहे. गझल ऐकून झाल्यावर तो फोटो मोठा करून पाहिला. स्वांड्या गेलाय, हे वास्तव मी कधीच स्विकारलंय. तो गेला त्या क्षणीच. मात्र तो गेल्यानंतरच्या तीनेक आठवड्यात एक नवाच शोध लागलाय. वास्तव स्विकारणं ही एकदा करून संपणारी प्रक्रिया नाही. एकच वास्तव तुम्हाला अनेकदा स्विकारावं लागू शकतं. स्वांड्याच्या व्हॉट्सअप अकाऊंटचं स्टेटस आणि डीपी पाहण्याचा विचार मनात आला. तेही केलं. त्या नंबरवर काही मेसेज करावा का, असा विचारही डोक्यात आला. पण नाही केला. माझ्या जागी स्वांड्या असता, तर त्यानं मेसेज केला असता, असं वाटलं.
  स्वांड्यासोबत घालवलेल्या दिवसांपेक्षा रात्रीचाच हिशेब अधिक. तो दिवसा काय किंवा रात्री काय, तसाच असायचा. आम्हाला मात्र दिवसा त्याच्याइतकं खुलायला कधी जमलं नाही. त्यासाठी रात्रीचाच आधार लागायचा. पाचेक वर्षांपूर्वी जेव्हा स्वांड्याशी नवी नवी मैत्री झाली होती, त्यावेळी गप्पा मारायला आम्हाला अख्खी रात्र लागायची. त्यानंतर उत्तरोत्तर कमी वेळेत सगळं बोलून व्हायला लागलं. पहाटे आम्ही झोपत असू. गप्पांची सुरुवात कुणाच्या तरी (बहुतेक वेळा एकमेकांच्या) टिंगलटवाळीनं व्हायची आणि त्यानंतर गप्पांचे विषय करिअर म्हणजे काय, संगीत ऍप्रिशिएट कसं करायचं, संगीतकार हाच कसा खरा कलाकार वगैरेंवर जायचे. मग त्यानं कधीकाळी आणि अलिकडे लिहिलेले लेख वगैरेंचं तो वाचन करायचा. आमच्यासोबत जयराम किंवा डॉक्टर(कोल्हापूरचा मित्र) असला की ते म्हणायचे, बास करा तुमचं बुद्धी बुद्धी चोदवणं. मग लगेच उपरोक्त विषयांवरून स्वांड्याचा मोर्चा डॉक्टर ऑफिसला येताना कशी पावडर लावून येतो, मी कसा टर्मिनेटरसारखा चालतो वगैरे विषयांकडं वळायचा. स्वांड्याला कधीच कुणी बोअर झालं नाही आणि त्यानंदेखील कधीच बोअर झाल्याचं दाखवलं नाही. आता वाटतं की आम्ही सगळ्यांनी त्याच्याकडून मनोरंजन करून घेता घेता त्याला खूपच बोअर केलं असणार. आणि आतादेखील स्वांड्याचं वाईट झालं, यापेक्षा स्वांड्या गेल्यामुळं माझं किती (मानसिक, भावनिक वगैरे) नुकसान झालं, याचा हिशेब करकरून आमच्या डोळ्यात पाणी येतंय. एकीकडं जगावं तर स्वांड्यासारखं, असं म्हणायचं आणि दुसरीकडं काहीही खाताना, पिताना, जागताना, फिरताना काही कमी-जास्त व्हायला नको, याच्या काळजीत जगायचं, हा दुटप्पीपणाही लक्षात आला स्वांड्याच्या मरणानंतरच. 
      त्याच्या भाच्याचा जन्म झाला, त्यावेळी त्यानं त्याच्याविषयी बरंच काय काय लिहून ठेवलं होतं. भाचा कळत्या वयाच्या झाल्यावर त्याला हे सगळं वाचून किती भारी वाटेल, या कल्पनेनं स्वांड्या एकदम तजेलदार व्हायचा. आपल्या जन्मावेळी असं कुणी लिहिलं नाही, मात्र तू तुझ्या मुलीबद्दल लिहून ठेव, असं वारंवार सांगायचा. त्याला लग्न करायची इच्छा होती. मात्र लग्न करण्यामागचा त्याचा अंतिम उद्देश हा चांगला बाप होणं, हा होता. अनेकदा त्यानं तो बोलून दाखवला होता. कशात काही नसताना, चांगला बाप होण्याच्या इच्छेनं लग्नाच्या तयारीला लागलेला माझ्या पाहण्यातला हा एकमेव माणूस. त्याच्या भाच्याशी त्याचं जमलेलं मेतकूट आणि वेणूसोबत त्याची जमणारी गट्टी यातसुद्धा त्याच्यातला बाप दिसायचा. राहून गेलं ते केवळ त्याचं बायोलॉजिकली बाप होणं.
स्वांड्या अकाली गेला हे खरं. मात्र त्याचं जे जगायचं राहिलं, ते पुढचं आयुष्य. मागचं सगळं आयुष्य तो भरपूर जगला. मागचं आयुष्य आपण जगलोच नाही, याची जाणीव ही अकाली निधनापेक्षा अधिक क्लेषदायक असते, हे डोक्यात येण्याचं कारणदेखील स्वांड्याच ठरला की! दशक्रियाविधीला पिंड ठेवल्या ठेवल्या कावळा शिवला.
रेल्वे स्टेशनच्या ब्रीजवर रात्रभर गप्पा मारत उभा असणारा स्वांड्या, साद्दा हक, एथ्थे रख, या गाण्यावर डोळे मिटून ठेका धरणारा स्वांड्या, दर पेगनिशी शांत होत जाणारा स्वांड्या, अरे वहिनीला भेटायला यायचंय, असं सुट्टीच्या आदल्या दिवशी सांगणारा आणि नंतर अरे जमलंच नाही म्हणणारा स्वांड्या, वैयक्तिक आयुष्यातलं काही शेअर करायचं असेल तर एकदा बसण्याची गरज आहे, असं सांगणारा स्वांड्या, जीएंनी ग्रेसना लिहिलेलं पत्र पहाटे तीन वाजता वाचून दाखवणारा स्वांड्या,  रॅशनल थिंकींग प्रत्यक्षात नाही जमत रे जोश्या असं म्हणत तोंड एवढंसं करून बसणारा स्वांड्या, असे अनेक वेगवेगळे स्वांडे आता आठवत राहतात. 

तो जिवंत असताना, हाकेच्या अंतरावर असताना, ऑफिसमध्येच असताना ज्या कारणांसाठी आठवत राहायचा, त्याच कारणांसाठी तो मेल्यावरही आठवत राहतो. एखाद्या किश्श्यासारखा. कुठलाही किस्सा हा प्रत्यक्षात घडत असताना त्याची महती लक्षात येत नाही. क्षणाक्षणाला घडत राहणाऱ्या घटनांसारखीच तीदेखील एक घटना असते. मात्र त्या घटनेचा, प्रसंगाचा जेव्हा भूतकाळ होतो, तेव्हा किस्सा म्हणून त्या घटनेची आठवण बनते. स्वांड्यासुद्धा एका किस्साच होता. तेव्हाही आणि आताही. 

3 comments:

  1. अमल्या खूप भारी दोस्त होता राव तुझा. पण एक आहे तुझ्या लिखाणावरून जाणवलं साला जेवढा जगला तेवढा बिनधास्त जगला.....किरण्या फ्रॉम नगर

    ReplyDelete
  2. स्वानंद.....कायम आठवणीत राहील....तशीच त्याची ही आठवणही....

    ReplyDelete
  3. छान असं पुन्हा पुन्हा व्यक्त होणं चांगलं असतं..त्यातून निदान त्या माणसाबद्दलच्या आत दडलेल्या भावनांना तरी शब्दावाटे वाट मोकळी करता येते...

    ReplyDelete